कृषी खात्याच्या बाईक रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी/ फोंडा
‘सेव्ह वॉटर,सेव्ह सॉईल’( पाणी वाचवा, माती वाचवा) ही जगभरातील पाणी व माती समस्या सोडविण्यासाठी केलेली जागतिक चळवळ आहे. माती संवर्धनाच्या संदेशासह गोव्यातील 35 गावातून एक दिवशीय बाईक राईडच्या माध्यमातून कृषी खात्यातर्फे केलेली जागृती हा सुप्त उपक्रम आहे. तेरेखोल पेडणे येथून प्रारंभ झालेल्या बाईक रॅलीचे काल शनिवारी दुपारी फोंडा येथील क्रांती मैदानावर आगमन झाल्यानंतर कृषी मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले.
कृषी संचनलायातर्फे माती व पाणी वाचविण्यासाठी जागृती म्हणून ही एक दिवशीय बाईक रॅली काढण्यात आली. तेरेखोल पेडणे येथून प्रारंभ झालेली रॅली साखळीमार्गे दुपारी फोंडयात आगमन झाले. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक यांनी बाईक राईडरना मार्गदर्शन करीत उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी रॅली कृषी खात्याचे संचालक नेवील आल्फोन्सो यांच्यासह कुडतरीचे आमदार तथा स्वतः शेतकरी असलेले आलेक्स रेजिनाल्ड बाईक रॅलीत सहभागी झाले होते. क्रांती मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कृषी खात्याचे संचालक नेल्सन अल्फोन्सो, नगरसेवक चंद्रकला नाईक, आनंद नाईक उपस्थित होते.
पाणी जपून वापरा, भविष्यात पाण्याची निर्यात करू-रवी नाईक
यावेळी बोलताना कृषी मंत्री रवी नाईक म्हणाले येत्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे. पाण्याचे संवर्धन केल्यास भविष्यात भारत देश पाण्याची निर्यात करणारा देश ठरू शकतो. चांगली माती आणि पाणी उपलब्ध असल्यानंतरच चांगले पीक घेता येते. मातीचा ऱहास रोखून मातीच्या संवर्धनसाठी कृषी खात्यामार्फत शेतकऱयांना मार्गदर्शन शिबिरे घेतली जात आहे. युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘सेव्ह वॉटर सेव्ह सॉईल’ अभियानात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले.
वडीलोपार्जित पारंपारिक शेती राखा-आलेक्स रेजिनाल्ड
यावेळी बोलताना अलेक्स रेजिनाल्ड म्हणाले मातीची गुणवत्ता मनुष्याच्या क्रियाकलपामुळे बिघडलेली आहे. मातीचे सेंद्रीय घटकाचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच सुपीक धोरणे निर्माण करण्यासाठी युवा शेतकरी तयार होणे अंत्यत गरजेचे आहे. वडीलोपार्जित पारंपारिक शेती राखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. गोमंतकीयांचे आरोग्याच्या रक्षणांसाठी सर्वानी एकत्र येत ‘पाणी वाचवा, माती वाचवा’ संकल्प करावा असे आवाहन रॅलीत स्वतः बाईक राईडरच्या वेशात सहभागी झालेले आलेक्स रेजिनाल्ड यांनी केले.
कृषी खात्यातर्फे पाणी वाचवा, माती वाचवा जागृती
कृषी संचालक नेवील अल्फोन्सो यांनी ‘पाणी आणि माती’ ही जगण्यासाठी महत्वाचे घटक असल्याचे सांगितले. कृषी खात्यामार्फत मंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साहसी बाईक राईडच्या माध्यामातून जागृती करण्यात आली आहे. आमदार रेजिनाल्ड हे शेतकऱयासाठी सदोदीत उपलब्ध राहणारे व्यक्तिमत्व असून त्याच्या सहभागामुळे युवा शेतकऱयानाही नवी दिशा मिळालेली आहे. ते शेतकरी क्लब, शेत नांगरणीसाठी आधुनिक यंत्रसामुग्री, रोपणी ते कापणीपर्यंत साहित्य शेतकऱयांना पुरविणारे अनुभवी शेतकरी असून त्याचा नेहमी पाठिंबा लाभत असल्याची माहिती अल्फोन्सो यांनी दिली. शेतकऱयाच्या जागृतीसाठी नियमितपणे शिबिरांचे आयोजनासह शेतकऱयांसाठी सॉईल हेल्थ कार्ड वितरण केल्याचे सांगितले.
काल शनिवारी दुपारी रॅलीचे आगमन फोंडा येथील क्रांती मैदानावर स्वागत झाले. दुपारचे अल्पोहार बेतोडा येथील सनग्रेस गार्डन येथे केल्यानंतर रॅली काब-द-राम येथे जाण्यासाठी रवाना झाली. सुमारे 85 बाईक राईडरनी रॅलीत सहभाग दर्शविला होता.









