स्थानिक नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगाईनगरमध्ये 500 हून अधिक घरे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या नगरला जाण्यासाठी रस्ता होता. मात्र आता विकासाच्या नावाखाली रस्त्यावरच अतिक्रमण होत आहे. त्यामुळे आम्हाला रस्ता नाही. तेंव्हा सिडीपीप्रमाणे असलेला रस्ता आमच्यासाठी उपलब्ध करावा, या मागणीसाठी मंगाईनगर येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी तीव्र संताप आणि आक्रोश देखील व्यक्त केला.
वडगाव येथील मंगाई देवस्थानच्या समोरच हा रस्ता आहे. मात्र त्या ठिकाणी बेकायदेशीर काम सुरू आहे. आमचा विकासाला विरोध नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही. पण ये-जा करण्यासाठी रस्ताच नसला तर आम्ही जायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तेंव्हा तातडीने आम्हाला रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या मोर्चामध्ये महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. मंगाई देवस्थानच्या विकासाला आम्ही सहकार्य करणार. कोणत्याही प्रकारे विरोध करणार नाही. मात्र आम्हाला ये-जा करण्यासाठी रस्ता हवा आहे, इतकीच आमची मागणी आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरच आता मोठी चर मारुन तो रस्ता अडविण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर स्वरुप धारण करत आहे. तेंव्हा याची चौकशी करून तातडीने आम्हाला रस्ता उपलब्ध करा, असे या निवेदनात म्हटले. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते.









