वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणात भाजप खासदार अरविंद धर्मपुरी यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदाराच्या हैदराबाद येथील घरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. भाजप खासदाराने राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि त्यांची मुलगी आमदार के. कविता यांच्यासंबंधी टिप्पणी केली होती. याच्या विरोधात टीआरएस कार्यकर्त्यांनी खासदाराच्या घरावर हल्ला केला आहे.
टीआरएस कार्यकर्त्यांनी खासदाराच्या निवासस्थानात शिरून तोडफोड केली आहे. यावेळी खासदार अरविंद यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील झाली आहे. तसेच भाजप खासदाराचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. पोलिसांनी टीआरएस कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यावेळी खासदार अरविंद हे घरात उपस्थित नव्हते.









