शुक्रवारच्या बैठकीत चित्र झाले स्पष्ट; बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी
आजरा प्रतिनिधी
संकेश्वर-बांदा महामार्ग आजरा तालुक्यातील 17 गावांच्या हद्दीतून जातो. महामार्गाबाबत सर्व गोष्टींची स्पष्ट व्हावी अशी मागणी बाधित शेतकरी व संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या महामार्गासाठी आजरा तालुक्यातील 13 गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीचे संपादन होणार असल्याचे स्पष्ट झाले. बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
प्रांताधिकारी बारवे म्हणाल्या, कोणत्याही शेतकऱ्यांच्या मनात शंका ठेवून काम करणे योग्य नाही. शेतकरी, व्यापारी व नागरीकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण होणार असून तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रत्येक शुक्रवारी आजरा तहसीलदार कार्यालयात उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे, शाखा अभियंता अनिल पाटील यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने महामार्गाची माहिती दिली. तब्बल 110 कि. मी. लांबीचा हा महामार्ग असून 61 किलो मीटर चे काँक्रीटीकरण होणार आहे. या मार्गाची आजरा तालुक्यातील लांबी 32 कि. मी. चे आहे. 10 मीटर रूंदीचा रस्ता, दोन्ही बाजूला 1 मीटर ची बाजूपट्टी व गटर्स असे रस्त्याचे काम होणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कॉ. संपत देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, कॉ. संजय तर्डेकर, कॉ. शिवाजी गुरव यांनी बाधित शेतकऱयांच्याबाजूने भूमिका मांडली. आमचा रस्त्याला विरोध नाही, पण बाधित शेतकऱयांना राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गाकरीता ज्या पद्धतीने नुकसान भरपाई दिली गेली त्या पद्धतीने इथल्या शेतकऱयांनाही भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आजरा शहरातून जाणाऱ्या रस्त्याबाबत स्पष्टता करावी अशी मागणी शिवाजीनगर येथील नागरीकांनी केली.
सध्या असलेला रस्ता शेतकऱ्यांच्या हद्दीतून गेलेला आहे, सातबाऱ्यावर तशा नोंदी असून फेरफार झालेला नाही. त्यामुळे रस्त्यासाठी भूसंपादन करताना जुन्या रस्त्यासाठी गेलेल्या जमीनी व आता होणारे संपादन या दोन्हीचे संपादन करून बाधित शेतकऱयांना भरपाई द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तर झाडांची झालेली तोड बेकायदेशीरपणे झाली असून शेतकऱयांच्या मालकीचीही झाडे तोडली गेली आहेत. त्याचा मोबदला त्या-त्या शेतकऱयांना मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत आजरा शहरातून होणाऱ्या रस्त्याबाबत नगरसेवक विलास नाईक, समीर मोरजकर, नाथ देसाई, अरूण देसाई, यशवंत इंजल, सुरेश देसाई यांनी प्रश्न उपस्थित केले. तर शिवाजी इंगळे, गणपती येसणे यांनीही शेतकऱयांच्या बाधित शेत जमीनीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर जेथे रस्त्यासाठी भूसंपादन होणार आहे त्या शेतकऱयांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱयासमोर मोजणी केली जाणार आहे. प्रत्येक गोष्ट बाधित शेतकऱयांना विश्वासात घेऊनच केली जाईल अशी ग्वाही प्रांताधिकारी बारवे यांनी दिली. या बैठकीला जयवंतराव शिंपी, गणपतराव डोंगरे, शिवाजी गुडूळकर यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.