ऑनलाईन टीम/तरुण भारत
एलॉन मस्क (Twitter CEO Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटरच्या धोरणात अनेक बदल केले आहेत. एलॉन मस्क यांनी आतापर्यंत ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. तर कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून ट्विटरमधून अनेक कर्मचारी राजीनामा दिला आहे. दरम्यान, एलॉन मस्क यांनी इशारा दिल्यानंतर ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी सामुहिक राजीनामा (Twitter Employees Resigned) दिला आहे. कर्मचारी कामाचा दबाव सहन करू शकत नसल्याचं म्हटलं जात आहे. मस्क यांनी ईमेलवरून सर्व कर्मचाऱ्यांना म्हटलं आहे की, तीन महिन्यांचे वेतन घेऊन राजीनामा द्यावा किंवा कठोर मेहनतीसाठी तयार रहावं. मस्क यांच्या या इशाऱ्यानंतर १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला.
दोन दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मेल केला होता. ट्विटरच्या यशस्वीतेसाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. अधिक मेहनतीसह जास्त वेळ काम करावं लागेल. या अटी मान्य असतील तरच नोकरी टीकेल, असा मेल एलॉन मस्क यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पाठवला होता. तसंच, या अटी मान्य असतील तर लिंकवर दिलेल्या ‘होय’वर क्लिक करा. ‘नाही’वर क्लिक केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. मात्र, हा मेल प्राप्त होताच, अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे.
आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला याची अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु तीन ट्विटर कर्मचार्यांनी याविषयी माहिती दिली आहे. एका अभियंत्याने सांगितले, “उत्तम पायाभूत सुविधांचे प्रतिनिधित्व करणारी संपूर्ण टीम स्वेच्छेने कंपनी सोडत आहे… आम्ही अनेक पर्यायांसह कुशल व्यावसायिक आहोत, त्यामुळे एलॉन आम्हाला राहण्याचे कोणतेही कारण दिले नाही आणि बरेच जण निघून जात आहेत.”
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. दरम्यान, अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ट्विटरने भारतातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.









