प्रतिनिधी / बेळगाव
जायंट्स सखीच्या माध्यमातून देण्यात येणारा पुरस्कार ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये प्रेरणा उत्पन्न करणारा असल्याचे मत माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी मांडले.
दरवषी बालदिनी कै. श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ जायंट्स सखी बाल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावषी हा कार्यक्रम सुवर्णलक्ष्मी सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी किल्लेकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रमुख पाहुण्या रेणू किल्लेकर, मधुरा शिरोडकर, ज्योती अनगोळकर, माजी अध्यक्षा नीता पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात जायंट्सच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर कै. श्वेता कारेकर हिच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत आणि प्रास्ताविक करताना संस्थापिका अध्यक्षा ज्योती अनगोळकर यांनी बालगौरव पुरस्काराबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचे अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनी समीक्षा महादेव कुगजी, योगिता यशवंत पाटील, किरण विकास लोहार, सन्मती बाहुबली शिरोटे या विद्यार्थिनींना रोख एक हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शालेय साहित्य आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या महेश बामणे, ऋतुजा पवार, सानिका नेसरीकर, मिथिला अनगोळकर, वैष्णवी बांदिवडेकर यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात
आले.
दुसऱया प्रमुख पाहुण्या मधुरा शिरोडकर यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी फेडरेशन संचालिका नम्रता महागावकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, शीतल नेसरीकर, ज्योती पवार, मनीषा कारेकर यांच्यासह सर्व सदस्या उपस्थित होत्या.









