संगणक विभागपमुखावर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात; ग्राहक, बँकेचे पैसे केले पत्नी, बहीण, वडील, वडिलांच्या मित्राच्या खात्यात वर्ग
चिपळूण प्रतिनिधी
शहरातील मोठ्या असलेल्या चिपळूण अर्बन बँकेत 37 लाख 75 हजार 450 रुपये 20 पैसे रूपयांचा अपहार झाल्याचे गुरूवारी शिक्कामोर्तब झाले आहे. या पकरणी बँकेच्या संगणक विभागपमुखावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याने ग्राहक व बँकेचे पैसे आपली पत्नी, बहीण, वडील व वडिलांच्या मित्राच्या खात्यांवर वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राहुल रमेश सुर्वे (31, मूळगाव-खेर्डी, शिवाजीनगर, सध्या सती) असे गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याची तकार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष विजय देसाई यांनी दिली. या तकारीत म्हटले आहे की, राहुल सुर्वे हा चिपळूण अर्बन बँकेत संगणक विभागप्रमुख म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याने 8 सप्टेंबर 2020 ते 1 आŸगस्ट 22 या कालावधीत स्वत: तसेच अन्य कर्मचाऱयांच्या पासवर्डचा वापर करून बँकेचे ग्राहक, बँक यांचे पैसे आपली पत्नी, बहीण, वडील व त्यांचे मित्र यांच्या खात्यात वर्ग केले. त्यानुसार पोलिसांनी अपहार करून बँकेंची फसवणूक केल्यापकरणी राहूल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या बाबतचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.
शहरातील ही सर्वात मोठी बँक आहे. त्यातच स्थानिक बँक असल्याने तिचा ग्राहकवर्ग मोठा आहे. असे असताना या बँकेत अपहार झाल्याने शहरात खळबळ उडाली असून ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापन आता ग्राहकांना कसा दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षांनी यापूर्वीच दिली होती माहिती
गेल्या काही महिन्यांपासून चिपळूण अर्बन बँकेत कर्मचाऱयाकडून अपहार झाल्याची चर्चा सुरू होती. असे असताना बँकेच्या अध्यक्षा राधिका पाथरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत या अपहाराची माहिती देत या प्रकाराची संपूर्ण चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते. तसेच चौकशीनंतर संबंधित कर्मचाऱयावर गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे गुरूवारी गुन्हा दाखल झाल्याने या अपहारावर शिक्कामोर्तब झाले आहे.