शिराळा / वार्ताहर
अस्वलवाडी (ता शिराळा) येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टर व मोटरसायकल स्वार यांच्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.संतोष शिवाजी कनुंजे (वय ४०) रा. शिराळा हा युवक सदर अपघातात जागीच ठार झाला आहे तर सागर नागेश माळी (वय २६) रा. खेड (ता शिराळा) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात जखमी सागर माळीचा चुलत भाऊ अविनाश अशोक माळी रा.खेड (ता. शिराळा) यांनी फिर्याद दाखल केली असून ट्रॅक्टर चालक प्रविण काशीनाथ साठे (वय ३९) रा. वाटेगांव (ता वाळवा) यास शिराळा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
शिराळा पोलिस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मयत संतोष कनुंजे व सुनील माळी हे कोकरुडकडे गेले होते. हे दोघे काम आटोपुन कोकरुड कडून दुचाकी (क्रमांक एम एच १० सीसी ७३९६) वरुन शिराळयाकडे येत होते.तर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (क्रमांक एम एच ०९ सीजे ७५५२) चालक प्रविण काशीनाथ साठे (वय ३९) रा. वाटेगाव (ता. वाळवा) हा मद्यधुंद अवस्थेत दालमिया शुगर कारखान्याकडे ऊस घेऊन चालला होता अशी चर्चा आहे तर ट्रॅक्टर चालकाने चुकीच्या बाजूने जाऊन मोटारसायकला जोराची धडक देऊन पुढे फरफट नेले. यामध्ये संतोष शिवाजी कनुंजे हा युवक जागीच ठार झाला तर सागर नागेश माळी हा गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय मोडला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे जखमी सागर यास कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी पाटील हे करीत आहेत.
संतोष कनुंजे हा विवाहित असून त्याचा
पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आईवडील व भाऊ असा परिवार होता. तर गंभीर जखमी असलेला सुनील माळी हा अविवाहित आहे. त्याच्या घरी फक्त आईवडील असून बहीण विवाहित आहे.
अपघाताची बातमी समजताच शिराळा येथील सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव, बसवेश्वर शेटे, आवटे, शुभम कनुंजे, महेश कनुंजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मनमिळाऊ संतोष
संतोष हा सर्वसामान्य घरातील आहे. मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. सोमवारीच त्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस त्याच्या मित्रांनी व एसटी डेपोमधील सहकार्यानी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तर संतोषची शिप्ट पाचची होती. त्यामुळे एसटी डेपोमधील त्याचे सहकारी मित्र त्याची वाट पहात होते. परंतु अचानक संतोष याच्या अपघाती निधनाची बातमी समजताच एसटी डेपोमधील अनेक कर्मचार्यांसह त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात संतोषच्या मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.