ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा अपघातात (Accident) मृत्यू झाला होता. आता या मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. सीआयडीनं (CID) मेटेंच्या वाहनचालकाची कसून चौकशी केल्यानंतर रायगड जिल्ह्यात रसायनी पोलिसात चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. लवकरच कार चालक एकनाथ कदम यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. रसायनी पोलिसांनी यात प्राथमिक चौकशी केली, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. सीआयडीने तपास केल्यानंतर मेटेंच्या वाहनचालकाविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय, मात्र तपास महाराष्ट्र सीआयडीकडूनच सुरू आहे. सीआयडीच्या चौकशीत चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.
विनायक मेटे यांच्या गाडीचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषम अपघात झाला होता. त्यांना मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी विनायक मेटे यांना मृत घोषित केलं होतं. त्यावेळी विनायक मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं.
राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनाही विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करून निष्कर्ष सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. सीआयडीने विनायक मेटे यांची कार ज्या मार्गावरून गेली तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले.