ऑनलाईन टीम / तरुण भारत :
घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या गरीब कल्याणच्या योजना कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्टय़ आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंगळवारी केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील 10 लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवण्याच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, गरीब कल्याणच्या योजनांवर पूर्वी बोललं जायचं. पण या योजना कधी प्रत्यक्षात आणल्या गेल्या नाही. मोदी सरकारने गरीब कल्याण हे एकमेव उद्दिष्ट ठेवून अनेक योजना सुरु केल्या. एक पैशाचाही भ्रष्टाचार न होता या योजनांचे लाभ गोरगरीबांपर्यंत पोहचत आहेत. धर्म, जात, पंथ न पाहता गरीबांपर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ पोहचविले जात आहेत. वेगवेगळय़ा योजनेच्या लाभार्थ्यांची पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा प्रदेश भाजपाचा उपक्रम अभिनंदनीय आहे. प्रदेश भाजपने ठरवलेले अडीच कोटी लाभार्थ्यांची पत्रे पाठवण्याचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीत साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्वरेने कार्यरत व्हावे असेही फडणवीस म्हणाले.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली!
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील 13 कोटी जनतेपैकी 5 कोटी 65 लाख लोकांना मोदी सरकारच्या वेगवेगळय़ा योजनांचा लाभ मिळाला आहे. यापैकी अडीच कोटी लाभार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. हे उद्दिष्ट आम्ही नक्की साध्य करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.