170 अंकांसह सेन्सेक्स घसरणीत, रिलायन्स इंडस्ट्रिज नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअरबाजार काहीसा नकारात्मक स्थितीत बंद झाला. जागतिक स्तरावर अमेरिका व आशियाई बाजारात घसरणीचा कल होता. त्यामुळे त्याचा परिणाम सोमवारी भारतीय बाजारावर दिसला. आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रिज यासारख्या कंपन्यांच्या समभागाने बाजाराला म्हणावा तसा आधार दिला नाही.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 170 अंकांच्या घसरणीसह 61,624.15 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 20 अंकांनी घसरून 18.329.15 अंकांवर बंद झाला. दिवसभरामध्ये सेन्सेक्सने 61,572 चा निच्चांकी व 61,916 चा उच्चांकी भाव प्राप्त केला होता. डॉ. रेड्डीज लॅब्ज, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नेस्ले, टायटन, महिंद्रा आणि महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सोमवारी घसरणीत होते. कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, पॉवर ग्रीड कॉर्प, इंडस इंड बँक, इन्फोसिस आणि मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले.
जागतिक बाजारामध्ये सोमवारी काहीसा चढउतार दिसून आला होता. त्याचप्रमाणे अमेरिकेतील बाजारही महागाईच्या मुद्दय़ावरून काहीसे सावधगिरीने व्यवहार करत होते. एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक सोमवारी कमकुवत दिसून आला. हा निर्देशांक 1.3 टक्के इतका घसरून बंद झाला. याउलट रिऍल्टी निर्देशांक 1 टक्का आणि आयटी निर्देशांक 0.7 टक्के वधारत बंद झाला. आज एकंदर बाजाराचा मूड काहीसा नकारात्मकच राहिला.
जागतिक बाजारामध्ये अमेरिकेतील नॅसडॅक निर्देशांक 209 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. युरोपियन बाजारातही तेजी दिसून आली. आशियाई बाजारात मात्र चढउतार दिसला. यामध्ये निक्की 300 अंकांनी, कोस्पी 8, शांघाय कम्पोझिट 3 अंकांनी घसरणीत होता.









