कुलगुरुंशी सकारात्मक चर्चा, भत्ता वाढीसाठी राज्य सरकारकडे पत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
मूल्यांकनासाठी नेमणूक केलेल्या प्राध्यापकांनी अखेर आपले आंदोलन शनिवारी मागे घेतले. आरसीयूच्या कुलगुरुंशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स असोसिएशनने आंदोलन मागे घेतले. नऊ दिवसांच्या आंदोलनानंतर सोमवार दि. 14 पासून मूल्यमापनाला सुरुवात होणार आहे.
मुल्यमापनासाठी देण्यात येणाऱया भत्त्यात वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स असोसिएशनतर्फे शुक्रवार दि. 4 पासून आंदोलन केले जात होते. आंदोलनामुळे पदवी अभ्यासक्रमाची मूल्यमापन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे याचा परिणाम निकालावर होण्याची शक्मयता वर्तविली जात होती. अखेर शनिवारी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रामचंद्र गौडा यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱयांना चर्चेचे आमंत्रण दिले.
तब्बल 5 तास चर्चा झाल्यानंतर कुलगुरुंनी भत्ता वाढविण्यासाठी सरकारला पत्र लिहिले, तसेच त्याची एक प्रत असोसिएशनच्या एका पदाधिकाऱयांकडे दिली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सोमवार दि. 14 पासून मूल्यांकनाचे काम सुरू करण्याचे मान्य करण्यात आले आहे. वाढीव भत्त्याची रक्कम थकबाकीच्या स्वरुपात देण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे असोसिएशनने हे आंदोलन मागे घेतले असून मूल्यमापन प्रक्रिया सुरळीत होणार आहे.









