412 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद ः 8 डिसेंबरला मतमोजणी
सिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी शनिवारी सायंकाळी 5 वाजता मतदान पूर्ण झाले. मतदान संपताच राज्यातील 412 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. आता गुजरातसह हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. मतदानाची वेळ संपल्यानंतर राज्यातील 68 जागांसाठी जवळपास 66 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून रविवारी सकाळी जाहीर होऊ शकते. 2017 मध्ये राज्यात 75.57 टक्के मतदान झाले होते.
हिमाचलच्या 68 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झाले आहे. लाहौल स्पितीमध्ये सर्वाधिक 62.75 टक्के मतदान झाले आहे. दुसऱया क्रमांकावर, सिरमौर जिह्यात 60.38 टक्के मतदान झाले आहे. तर, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृह जिल्हा मंडी 58.90 टक्के मतदानासह तिसऱया क्रमांकावर आहे. चंबा जिह्यात सर्वात कमी 46 टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात थंडी असली तरी मतदान केंद्रावर महिलांची गर्दी मोठी होती. लाहौल आणि स्पिती या उच्च-उंचीवर असलेल्या जिह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 21.95 टक्के इतके सर्वात कमी मतदान नोंदवले गेले होते.
सकाळी 8 वाजता मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. पण उन्हामुळे थंडीची चाहूल कमी होताच मतदानाला वेग आला. पहिल्या तासात केवळ पाच टक्के मतदान झाले होते, तर सकाळी 11 वाजेपर्यंत 19.98 टक्के मतदान झाले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत तो 37.19 टक्के आणि दुपारी 3 वाजेपर्यंत 55.65 टक्क्मयांपर्यंत पोहोचला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65.92 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, त्यांची पत्नी आणि दोन मुलींनी मंडी जिह्यातील सिराज येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर ठाकूर यांनी मतदारांना मोठय़ा संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाहीच्या उत्सवात जनतेने उत्साहाने सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. मतदान करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक मंदिरात प्रार्थना केली. हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांनी रामपूरमध्ये मतदान केले.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिह्यातील कल्पा गावातील मतदान केंद्रावर 90 वर्षीय नझरीम मणी यांनी आपल्या 87 वषीय पत्नीसमवेत मतदान केले, असे निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले. मतदान केल्यानंतर मणी यांनी राज्यातील मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. पहिल्यांदाच मतदारांना शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
412 उमेदवार रिंगणात
विधानसभा निवडणुकीत 412 उमेदवारांपैकी 24 महिला आणि 388 पुरुष आहेत. एकूण 55,92,828 मतदार त्यांचे प्रतिनिधी निवडतील. त्यापैकी 1,93,106 हे 18-19 वयोगटातील युवा मतदार आहेत. 80 वर्षांवरील 1,21,409 मतदार आहेत, तर आणखी 56,501 अपंग आहेत.
भाजपच्या आयटी सेलवर खोटे सर्वेक्षण केल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यात मुख्य लढत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आहे. मतदानाच्या रणधुमाळीत हिमाचल काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. भाजपच्या आयटी सेलने बनावट सर्वेक्षण अहवाल प्रसारित केल्याची तक्रार त्यांनी केली. हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजप मतदान हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला यांच्यावरही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाने लिहिलेले बनावट पत्र व्हायरल केल्याचा आरोप आहे. या पत्रात भाजपला जास्त जागा मिळतील आणि काँग्रेसला कमी जागा मिळतील, असे लिहिले आहे.
राज्यात सध्या भाजपची सत्ता
राज्यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. राज्यात सध्या भाजपची सत्ता असून 20 वर्षांनंतर सत्ताबदलाची प्रथा बदलण्यासाठी पक्षाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेसकडे सध्या 20 आमदार आहेत, तर भाजपकडे 45, 2 अपक्ष आणि 1 सीपीआयएम आमदार आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने जोरदार पूर्वतयारी केली होती. त्या तुलनेत काँग्रेसचे नेते प्रचारात पिछाडीवर असल्याचे दिसून आले होते.









