शेतकरी वर्गातून संताप, चौकशीची मागणी
युवराज भित्तम/म्हासुर्ली
राधानगरी,पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातून वाहणाऱ्या धामणी नदीवर म्हासुर्ली – चौधरवाडी दरम्यान पाटबंधारे विभागाचा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे.सदर बंधाऱ्याची पडझड झाल्याने मे २०२२ मध्ये लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली होती.मात्र यावर्षीच्या पहिल्याच पावसाळ्यात पुरामुळे बंधाऱ्याच्या तळातील सिमेंट काँक्रीटचे बांधकाम वाहून गेल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.परिणामी हा बंधारा शेतीसाठी की,अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण सोयीसाठी आहे.असा सवाल विचारला जात असून संबंधित बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करावी.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तीन तालुक्यात विस्तारलेल्या धामणी खोऱ्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे.त्यात गेल्या २२ वर्षापासून धामणी प्रकल्प रखडल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा होत नाही. तसेच शासनाच्या पाटबंधारे विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कोनोली – शेळोशी,म्हासुर्ली – चौधरवाडी, भित्तमवाडी – गवशी, पणोरे – हरपवडे, आंबर्डे – वेतवडे गावाच्या दरम्यान धामणी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत
मात्र सदर सहा बंधाऱ्यांचे बांधकाम सुमारे ४०ते ४५ वर्षांपूर्वीची असून निकृष्ट झाल्याने, सर्व बंधारे पूर्वीपासूनच गळके ठरले आहेत.परिणामी सदर बंधाऱ्यांयांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा कधीच झाला नाही.त्यामुळे शेतीव्यवसायाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने,यावर पर्याय म्हणून धामणी खोऱ्यातील शेतकरी सर्व बंधाऱ्यांना स्वखर्चाने समांतर मातीचे बंधारे घालून पाणीसाठा करत शेती पिकवत आहेत.
अशाप्रकारे निरुपयोगी ठरणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या सर्व गळक्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने कोट्यावधीचा निधी पाण्यासारखा खर्च केला आहे.मात्र त्याचा किती फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे. शनिवारी सकाळी म्हासुर्ली – चौधरवाडी दरम्यानच्या बंधाऱ्यात बरगे घालण्यासाठी व मातीचा बंधारा उभारण्यासाठी परिसरातील शेतकरी एकत्र जमले होते.त्यावेळी सदर बंधाऱ्याची पाहणी केली असता गतवर्षी मे महिन्यात केलेले सिमेंट काँक्रीट मधील बांधकाम वाहून गेल्याचे निदर्शनात आल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.
त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती नेमकी शेतीसाठी केली? की अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सोयीसाठी केली? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहे.तरी पाटबंधारे विभागाने संबंधित बंधाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून बंधाऱ्याची नव्याने दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दुरुस्ती नेमकी कोणासाठी..!
मे महिन्याच्या अखेरीस या बंधार्याची संबंधित विभागाकडून दुरुस्ती करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसात केलेले बांधकाम वाहून गेले आहे.त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा खर्च नेमका कोणाच्या फायद्यासाठी.- रंगराव चौधरी, शेतकरी,चौधरवाडी.
मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार देणार…
गतवर्षी धामणी नदीवरील सुमारे पाच – सहा बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे.बंधाऱ्याचे कामे निकृष्ट झाल्याने शेतकऱ्यांना मातीचे बांध घालावे लागत आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. याबाबत मुख्यमंत्री व संबंधित मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून संबंधीत विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांची सखोल चौकशी करावी अन्यथा आंदोलन छेडणार.
तानाजी कांबळे, गगनबावडा तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)