रत्नागिरी/प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री अॅड.अनिल परब यांच्या दापोलीतील बेकायदेशीर साई रिसॉर्ट प्रकरण तडीस नेण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी चंग बांधला आहे. या रिसॉर्टपकरणात सोमय्या यांचा शुकवारी 10 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी पोलिसांनी आपला चार पानी जबाब नोंदवून घेतला. ६२ पानांचे पुरावेही त्यांनी पुन्हा पोलिसांना सादर केलेले आहेत. प्रकिया पूर्ण होताच ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी साई रिसॉर्ट तोडले जाईल त्या दिवशी आपण स्वत दापोली येथे हजर राहणार असल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपानेते किरीट सोमय्या शुकवारी रत्नागिरी पोलिसांना जबाब नोंदवून झाल्यानंतर येथील भाजपा जिल्हा कार्यालयात पत्रकार घेतली. त्यांनी सांगितले की, अॅड. अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट पकरणी पोलीस कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. पण दुसऱ्या बाजूला साई रिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचे सांगितले. अॅड. परब पालकमंत्री असताना अधिकाराचा वापर करून दापोली येथे बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारले. कोरोनात १०० टक्के लॉकडावून असतानाही हा रिसॉर्ट बांधण्यात आलेले आहे. पण या रिसॉर्टच्या खरेदी-विक्री प्रकरणातील पैसे दिल्याचा तपशीलही अॅड. अनिल परब यांनी का लपवला आहे? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.