पाण्याविना लोकांचे हाल : संतप्त लोकांचा अभियंत्यांना घेराव : रामनगरी कुडतरी येथील घटना
प्रतिनिधी / मडगाव
कुडतरी मतदारसंघातील रामनगरी भागात घरातील सांडपाणी रस्त्यावर वाहात असल्याचे कारण देत आरोग्य खात्याच्या आदेशावरून सुमारे 1000 लोकांची पाण्याची कनेक्शन तोडण्यात आली. यामुळे या भागात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून संतप्त झालेल्या लोकांनी काल बुधवारी सांडपाणी महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रकाश पै याना घेराव घालून जाब विचारला. यावेळी त्यांच्याबरोबर कुडतरी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य मोरेन रिबेलो हेही उपस्थित होते.
रामनगरी परिसरात सांडपाणी वाहिनी टाकून पाच वर्षे झाली तरी ती कार्यान्वति केलेली नाही. त्यामुळे या भागातील लोकांनी या वाहिनीच्या जोडणीसाठी सात महिन्यांपूर्वी अर्ज करूनही त्यांना कनेक्शन मिळालेले नाही. अशा परिस्थितीत या रहिवाशांचे सांडपाणी रस्त्यावर वाहते असे कारण पुढे करून मंगळवारी त्यांचे पाण्याचे कनेक्शन तोडल्याने पाण्यासाठी त्यांचे हाल झाले. तोडलेली कनेक्शन पुन्हा जोडून द्यावे या मागणीसाठी रामनगरीतील नागरिकांनी अभियंत्याच्या कार्यालयावर धडक दिली.
यावेळी बोलताना रिबेलो यांनी एका शुल्लक गोष्टीसाठी ही वाहिनी कार्यान्वति करण्यापासून बंद ठेवली असून सरकारी अनास्थेचा बळी मात्र लोक ठरत असल्याचा आरोप केला. सांडपाणी वाहून जाण्याची पुरेशी व्यवस्था सरकार करू शकत नसेल तर त्याचा दंड लोकांना का असा सवाल केला.
या रहिवाशांनी मागच्या एप्रिल महिन्यात या जोडण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, एक पॅनल बसवायचे बाकी आहे असे सांगून ही वाहिनी कार्यान्वति केली जात नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हे काम होत नसेल तर त्या खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी राजीनामा देऊन घरी बसावे असेही मोरेन रिबेलो म्हणाले.
दरम्यान, हे पॅनल बसवायचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल तोपर्यंत या भागातील लोकावर कुठलीही कारवाई करू नये अशी मागणी आम्ही आरोग्य खात्याकडे करणार आहोत. या लोकांना या वाहिनीच्या जोडण्या लवकरच मिळतील, अशी माहिती सांडपाणी व्यवस्थापन महामंडळाचे कार्यकारी अभियंते पै यांनी दिली.
पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आल्याने काल या भागातील लोकांची प्रचंड गैरसोय झाली. पाणी मिळविण्यासाठी लोकांना बरीच धावपळ करावी लागली.









