रवि ऍटो इलेक्ट्रिकल वर्क्स दुकानातील सुमारे 18 लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग लागली
प्रतिनिधी/तासगाव
तासगांवातील पुणदी रोड येथे तीस वर्षापूर्वीपासून सुरू असणाऱ्या रवि ऍटो इलेक्ट्रिकल (पार्टस) वर्क्स या दुकानास शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भिषण आगीत रोख रक्कमेसह मशिनरी व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे 18 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे दुकान मालकांनी तरूणभारतशी बोलताना सांगितले आहे. ही घटना गुरूवारी सुरू रात्री 1.30 च्या दरम्यान घडली आहे.
तासगांवातील पुणदी रोड येथे एकनाथ बसगौंडा आयवळे यांनी 1992 मध्ये स्पेयर पार्ट्सचे दुकान सुरू केले. येथे सर्व प्रकारच्या बॅटरीज चार्जिंग व विक्री, सर्व प्रकारचे स्टार्टर, अल्टरनेटर, जे.सी.बी. आणि बोअर मशिन स्टार्टर, तसेच ई.सी.एम. रिपेअरी व इतर कामे केली जात आहेत. तर स्पेअर पार्टची विक्री ही येथून होत आहे. तब्बल 30 वर्षे सेवा देणाऱया या दुकानाने रवि बॅटरी अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बुधवारी रात्री 10.30 च्या दरम्यान नेहमीप्रमाणे हे दुकान बंद करण्यात आले. तर नेहमीप्रमाणे बॅटरी चार्जिंग मशिन सुरू होती. गुरूवारी सुरू रात्री 1.30 च्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन या दुकानाला भिषण आग लागली. या आगीत दुकानातील बॅटऱ्या फुटून आवाज येऊ लागला. या आवाजाने शेजारील एका व्यक्तिने बाहेर येऊन पाहिले असता दुकानातील आगीचे दृश्य दिसून आले.
युवकांच्याकडून पाण्याचा मारा
सय्यद यांनी फोन करून दुकान मालक आवळे यांना याबाबतची माहिती दिली व ते तातडीने दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी दुकानातून आगीच्या ज्वाला व दुकान आगीच्या भक्षस्थानी असेच चित्र पाहवयास मिळाले. दरम्यान आजू बाजूच्या 10 ते 15 युवकांनी अन्य ठिकाणी आग पसरू नये म्हणून मिळेल तेथून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
तातडीने न.प.अग्निशमनदल दाखल
आगीचे रौद्ररूप पाहून नगरपरिषदेच्या अग्निशमन गाडीस पाचारण करण्यात आले. आरोग्य निरीक्षक आयुब मणेर यांच्यासह फायरमन वसीम मुजावर, चालक सुरेंद्र होवाळ, शेखर घोलप, या पथकाने तातडीने अग्निशमन गाडीसह घटनास्थळी धाव घेतली. व पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. तर घटनास्थळी पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच विज वितरण कंपनी स. अभियंता के. के. भोईटे यांनी ही भेट देऊन पाहणी केली. पाहणी करून त्यांनी शॉर्टसर्किटने ही आग लागली असल्याचे सांगितले आहे.
आगीत सुमारे 18 लाखांचे नुकसान
रात्रीचे दिड ते अडीच अशी सुमारे एक तास ही आग सुरू होती. या आगीत दुकानातील सुमारे 18 लाखांचे नुकसान झाले आहे. ते असे- नविन लहान मोठया 20 बॅटऱया-सुमारे 2 लाख रूपये, चार्जर मशिन दोन प्रत्येकी 3 लाख प्रमाणे सुमारे 6 लाख रूपये, स्कॅनर मशिन-2 लाख 50 हजार रूपये, ई.सी.एम.मशिन-3 लाख रूपये, स्पेअर पार्ट-1 लाख 50 हजार रूपये, जुन्या बॅटऱया 18-megceejs 1 लाख रूपये, 7 स्टार्टर व 9 अल्टरनेटर,-1 लाख रूपये, तसेच काऊंटर मध्ये ठेवलेली 8 हजार रोख रक्कम व फर्निचर असे सुमारे 1 लाख रूपये असे एकूण सुमारे 18 लाख रूपयांचे नुकसान झालेचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे अशी माहिती दुकान मालक आयवळे यांनी दिली.