टाळसुरे/वार्ताहर
दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. परब यांना खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.
दापोली पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुह्याप्रमाणे परब यांच्या साई रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण नसताना चुकीच्या पद्धतीने नोंद करून कर आकारणी झाल्याचे आढळून आले होते. दापोलीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार परब यांच्यासह तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर संशयित म्हणून भादंवि 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
साई रिसॉर्ट, सी कोचबाबत दापोली न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी अनिल परब, सदानंद कदम, पुष्कर मुळे यांना दापोली न्यायालयात हजर राहण्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी रिसॉर्टचे बांधकाम करीत असताना सी. आर. झेड. अधिसूचना 2011 नुसार नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बांधकाम झाले आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने 17 नोव्हेंबर 2021 रोजी साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्टला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यानंतर त्यांनी कलम 5 च्या तरतुदीनुसारही नोटीस जारी केली.
पर्यावरण संरक्षण कायदा 1986 द्वारे 31 जानेवारी 2022च्या आदेशाद्वारे साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट यांना निर्देश देऊन अनधिकृत संरचना काढून टाकण्यास सांगितले होते. या आदेशाचे पालन झाले नसल्याने तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालयाने बनवलेल्या नियमांचे उलंघन झाल्याने 14 डिसेंबरपर्यंत चौकशीसाठी अनिल परब यांच्यासह सदानंद कदम, पुष्कर मुळे यांना दापोली कोर्टात हजर रहावे लागणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. पर्यावरण मंत्रालयातर्फे प्रसाद कुवेस्कर यांनी प्रभावी युक्तीवाद केला. यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ होत आहे.