न्यूझीलंडवर 7 गडय़ांनी एकतर्फी विजय, ‘सामनावीर’ मोहम्मद रिझवान, बाबर आझम यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ सिडनी
शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजी त्याचप्रमाणे कर्णधार बाबर आझम व मोहमद रिझवान यांच्या समयोचित अर्धशतकांच्या जोरावर सिडनी मैदानावर बुधवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पाच चेंडू बाकी ठेवून सात गडय़ांनी दणदणीत पराभव केला. आयसीसीच्या या स्पर्धेत पाकने तब्बल 13 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची पाकची ही तिसरी वेळ आहे.
बुधवारच्या महत्त्वाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण पाकच्या भेदक आणि वेगवान गोलंदाजीसमोर न्यूझीलंडला 20 षटकात 4 बाद 152 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर रिझवान व कर्णधार बाबर आझम यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकने 19.1 षटकात 3 बाद 153 धावा जमवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

सिडनीची खेळपट्टी वेगवान आणि स्वींग गोलंदाजीला अनुकूल असल्याने त्याचा लाभ पाकच्या शाहीन आफ्रिदी, हॅरीस रौफ, नसीम शहा तसेच मोहम्मद वासीम यांनी पुरेपूर घेतला. न्यूझीलंडचा संघ क्षेत्ररक्षणात जगातील एक दर्जेदार म्हणून ओळखला जातो, पण या सामन्यात त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत गचाळ झाले. न्यूझीलंडच्या डावाला पहिल्या षटकापासूनच गळती लागली. शाहीन आफ्रिदीचे पहिले षटक महत्त्वाचे ठरले. न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज ऍलेनने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिडऑनच्या दिशेने चौकार ठोकून न्यूझीलंडचे खाते उघडले. त्यानंतर पुढील चेंडूवर ऍलेन पूर्णपणे फसल्यावर पंच इरासमूस यांनी ऍलेनला पायचित म्हणून घोषित केले. त्यानंतर न्यूझीलंडने डीआरएसची मागणी केली. यामध्ये ऍलेन नाबाद असल्याचे दिसून आले पण शाहीनच्या या षटकातील पुढच्याच चेंडूवर ऍलेन पुन्हा फटका मारण्याच्या प्रयत्नात चुकला आणि पंचांनी त्याला पायचित म्हणून घोषित केले. न्यूझीलंडचा हा सलामीचा फलंदाज तिसऱयाच चेंडूवर तंबूत परतला. दुसऱया बाजूने सलामीचा फलंदाज कॉनवेने आक्रमक फटके मारत संघाच्या धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एकेरी धाव घेण्याच्या नादात तो मिडऑफवरील शदाब खानच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. त्याने 20 चेंडूत 3 चौकारासह 21 धावा जमविल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला ग्लेन फिलिप्स केवळ 8 चेंडू खेळू शकला. आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहमद नवाजने स्वतःच्याच गोलंदाजीवर फिलिप्सचा झेल टिपला. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमविल्या. न्यूझीलंडची स्थिती यावेळी 8 षटकात 3 बाद 49 अशी होती.
कर्णधार विल्यम्सन आणि डॅरील मिचेल यांनी संघाचा डाव सावरला पण त्यांना धावांची गती वाढवता आली नाही. या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 8.2 षटकात 68 धावांची भागीदारी केली. पाकचे क्षेत्ररक्षण न्यूझीलंडच्या तुलनेत या सामन्यात अधिक दर्जेदार झाले. अर्धशतकाच्या समीप असलेला कर्णधार विल्यम्सन शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. विल्यम्सनने आपल्या खेळीमध्ये एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत धावफलक हलता ठेवला. त्याने 42 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 46 धावा झळकवल्या. या जोडेने 36 चेंडूत अर्धशतकी भागीदारी नोंदवली.
डावातील शेवटच्या काही षटकामध्ये न्यूझीलंडला चौकार आणि षटकार मिळू शकले नाहीत. मिचेलने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मिचेल आणि नीशम यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 35 धावांची भर घातली. मिचेलने 35 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 53 तर नीशमने 12 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमविल्या. या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सामन्यात पाकचे गोलंदाज फारसे प्रभावी वाटत नव्हते. पण बुधवारच्या सामन्यात त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून न्यूझीलंडला मोठय़ा धावसंख्येपासून रोखण्यात यश मिळवले. न्यूझीलंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. पाकतर्फे शाहीन आफ्रिदीने 24 धावात 2 तर मोहमद नवाजने 12 धावात 1 गडी बाद केला.
कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामीच्या जोडीने पाकच्या डावाला चाचपडतच सुरुवात केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बोल्टच्या पहिल्या षटकात बाबर आझमला खाते उघडण्यापूर्वी न्यूझीलंडकडून जीवदान मिळाले. कॉनवेने हा झेल सोडला. या जीवदानाचा लाभ घेत आझमने त्यानंतर मनमोकळेपणाने फलंदाजी केली. मात्र रिझवान सुरुवातीपासूनच तंत्रशुद्ध फलंदाजी करत होता. पॉवरप्लेमध्ये या जोडीने 55 धावा जमविल्या. आझम आणि रिझवान यांनी न्यूझीलंडच्या बोल्ट, साऊदी आणि फर्ग्युसन या वेगवान गोलंदाजांना सावध पण समर्थपणे तोंड दिले. कर्णधार विल्यम्सनने सँटनर आणि सोधी या फिरकी गोलंदाजांना पाचारण केले. त्यावेळी रिझवानने या दोन्ही गोलंदाजांच्या षटकामध्ये स्वीपच्या फटक्यावर अधिक भर दिला. बाबर आझमने स्क्वेअर लेगच्या दिशेने शानदार फटके मारले. न्यूझीलंडला पाकची ही सलामीची जोडी फोडण्यात 13 व्या षटकात यश मिळाले. बोल्टच्या गोलंदाजीवर मिचेलने लाँगऑनवर बाबरचा झेल घेतला. बाबरने 42 चेंडूत 7 चौकारासह 53 धावा जमविताना रिझवान समवेत सलामीच्या गडय़ासाठी 76 चेंडूत 105 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडला हे यश मिळाले पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. पाकला यावेळी विजयासाठी केवळ 48 धावांची जरुरी होती. बाबर आझमचे या स्पर्धेतील हे पहिले अर्धशतक आहे. 17 व्या षटकात बोल्टने रिझवानला फिलिप्सकरवी झेलबाद केले. त्याने 43 चेंडूत 5 चौकारासह 57 धावा जमविल्या. रिझवानचे या स्पर्धेतील हे पहिले अर्धशतक आहे. रिझवानने हॅरीससमवेत दुसऱया गडय़ासाठी 27 धावांची भर घातली.
पाकला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी 21 धावांची जरुरी होती. 19 व्या षटकात सँटनरने हॅरीसला झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 30 धावा जमवल्या. पाकला विजयासाठी शेवटच्या षटकात केवळ दोन धावांची जरुरी होती. शान मसूद आणि इफ्तिकार अहमद यांनी शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. साऊदीच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर शान मसूदने विजयी धाव घेतली. पाकच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे बोल्टने 33 धावात 2 तर सँटेनरने 26 धावात 1 गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकात 4 बाद 152 (ऍलेन 4, कॉनवे 21, विल्यम्सन 46, फिलिप्स 6, मिचेल नाबाद 53, नीशम नाबाद 16, शाहीन आफ्रिदी 2-24, मोहम्मद नवाज 1-12), पाक 19.1 षटकात 3 बाद 153 (मोहम्मद रिझवान 57, बाबर आझम 53, मोहम्मद हॅरीस 30, शान मसूद नाबाद 3, बोल्ट 2-33, सँटेनर 1-26).









