ऑनलाईन टीम/तरुण भारत
राहुल गांधी (Rahul Gandhi) च्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. या यात्रेला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ट्विटर हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याच्या निर्णय बेंगळूर न्यायालयाने घेतला होता. मात्र सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, एका याचिकेवर सुनावणी करत असताना बेंगळूर न्यायालयाने काँग्रेसचे दोन्ही ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनदरम्यान कॉपी-राईट कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे अकाऊंट ब्लॉक करण्यात येणार होते. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर कॉंग्रेसला दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : ईडीची स्थगितीची मागणी कोर्टानं फेटाळली,संजय राऊतांचा मार्ग मोकळा
काँग्रेसने एका चित्रपटातील गाणे संबंधित कंपनीच्या परवानगीशिवाय वापरल्याबद्दल काँग्रेसचे आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात यावेत असे आदेश बेंगळूरच्या न्यायालयाने दिले होते. काँग्रेसवर ‘KGF-2’ चित्रपटातील गाणे वापरून कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘एमआरटी म्युझिक’ने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कंपनीच्या याचिकेवर बेंगळूर न्यायालयाने भारत जोडो अभियानाच्या वेबसाइटवर आणि काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
बेंगळूर न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना बेंगळूर न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयात काँग्रेस पक्षातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ४५ सेकंदांच्या क्लिपमुळे काँग्रेस आणि भारत जोडी यात्रेचे संपूर्ण ट्विटर हँडल ब्लॉक करू नये किंवा ते हटवू नये.
याप्रकरणी एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरुद्ध कलम ४०३ (अप्रामाणिकपणे मालमत्तेचा गैरवापर), ४६५, १२० कलम ४०६ आणि १२० बी आर/डब्ल्यू कलम ३४ अन्वये तक्रार दाखल केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६६ आणि कॉपीराइट कायदा, १९५७ च्या कलम ६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.