प्रतिनिधी/ पणजी
विमानतळाचे बांधकाम केलेल्या जीएमआर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीने नवीन विमानतळाच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण केले असून त्यातून स्मार्ट गोवा राज्याची ओळख होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
गोव्यातील शांत, स्वच्छंदी, आनंदी व आरामदायी अशा वातावरणाची पारख त्या बोधचिन्हातून होते असे कंपनीचे म्हणणे आहे. मोप विमानतळाचा शुभारंभ होण्याची वेळ जवळ येऊन ठेपल्याने कंपनीतर्फे बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून त्याचा वापर तेथील सर्व सेवा कामकाजातून करण्यात येणार आहे.
सूर्य, सागर, आकाश, पृथ्वी, समुद्रकिनारा आणि मौज-मजा अशी एकंदरीत असलेली गोव्याची प्रतिमा अस्मिता त्या बोधचिन्हात सामावलेली आहे. विमानतळ म्हणजे टेकडी, पाणी, वनराई, असे सभोवतालचे चित्र असून एका समुद्राकिनारी एका खुर्चीवर माणसाने बसावे आणि सुटीचा आनंद मनसोक्तपणे घ्यावा असे चित्र बोधचिन्हातून दर्शविण्यात आले आहे.
जीएमआर कंपनीचे सीईओ आर. व्ही. शेषन यांनी सांगितले की मोप विमानतळ आणि त्याच्या बोधचिन्हावर आम्ही आनंदी असून गोवा राज्याचे महत्व लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आली आहे. हा विमानतळ 24 तास प्रवासी, माल वाहतूक यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत रहाणार असून प्रतिवर्षी 4.4 मिलियन प्रवाशांची वाहतूक होईल असे ते म्हणाले.









