वृत्तसंस्था/ मेलबर्न
इंग्लंड विरुद्ध होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली असून फलंदाज ट्रव्हिस हेडचे संघात पुनरागमन झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान आणि विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान पहिल्या फेरीतच समाप्त झाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी परिपूर्ण संघ निवडण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हे सामने ऍडलेड, सिडनी आणि मेलबोर्न येथे खेळविले जातील. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत इंग्लंड विरुद्ध विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. ऍरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्याने त्याच्या जागी ट्रेविस हेडला संधी देण्यात आली आहे. हेडने 2022 च्या क्रिकेट हंगामात वनडे प्रकारात 310 धावा जमवल्या आहेत. लंकेमध्ये झालेल्या तिरंगी वनडे मालिकेत पाकविरुद्ध हेडने दर्जेदार कामगिरी केली होती. या तिरंगी मालिकेत सलग दोन सामन्यात हेडने 101 आणि 89 धावा झळकविल्या होत्या.
ऑस्ट्रेलियन वनडे संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), ऍगर, कॅरे, कॅमेरून ग्रीन, हॅजलवूड, ट्रव्हिस हेड, लाबुशिंगे, मिचेल मार्श, मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, स्टोइनिस, वॉर्नर आणि झाम्पा.









