इतिहास रचला जाणार ः 12-16 नोव्हेंबरदरम्यान श्रीहरिकोटा येथून होणार प्रक्षेपित
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारताचा पहिला खासगी रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून 12-16 नोव्हेंबरदरम्यान आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. स्पेस स्टार्टअप कंपनी स्कायरुट एअरोस्पेसने मंगळवारी यासंबंधी माहिती दिली आहे. स्कायरुट एअरोस्पेसचा विक्रम-एस नावाचा रॉकेट टेस्ट फ्लाईटसाठी सज्ज असून तो प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने कंपनीला 12-16 नोव्हेंबरचा कालावधी दिला आहे.
स्कायरुट एअरोस्पेसच्या या मोहिमेला ‘मिशन प्रारंभ’ नाव देण्यात आले आहे. हा रॉकेट 3 पेलोड अंतराळात नेणार आहे. या रॉकेटचे नाव प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. डॉक्टर विक्रम साराभाई यांनीच इस्रोची स्थापना केली होती.
रॉकेट प्रक्षेपणाची अंतिम तारीख हवामानाच्या स्थितीनुरुप निश्चित होणार आहे. विक्रम-एस रॉकेट अत्यंत कमी कालावधीत केवळ इस्रो आणि इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायजेशन सेंटरच्या सहकार्यामुळेच तयार होऊ शकले आहे, असे उद्गार कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक पवन कुमार चांदना यांनी काढले आहेत.
विक्रम-एस रॉकेट एक सिंगल स्टेज सब-ऑर्बिटल लाँच व्हेईकल असून ते तीन पेलोड अंतराळात नेणार आहे. मिशन प्रारंभसोबतच स्कायरुट एअरोस्पेस रॉकेट प्रक्षेपित करणारी भारतातील पहिली खासगी अंतराळ कंपनी ठरणार असल्याचे कंपनीचे सह-संस्थापक नागा भरत डाका यांनी म्हटले आहे.
भविष्यात रॉकेट प्रक्षेपण होणार स्वस्त
स्कायरुट एअरोस्पेस भारताच्या अंतराळ क्षेत्रात इतिहास रचणार आहे. या रॉकेट प्रक्षेपणानंतर भारतात रॉकेट प्रक्षेपणाची प्रक्रिया 30-40 टक्के स्वस्त होऊ शकते. या रॉकेटमध्ये 3डी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात येत आहे. या इंजिनात विशेष प्रकारच्या इंधनाचा वापर केला जाणार आहे. हे इंधन किफायतशीर असण्यासह पर्यावरणाला कमीतकमी हानी पोहोचविणारे असणार आहे. हे रॉकेट प्रक्षेपण यशस्वी ठरल्यास भविष्यात याच किफायतशीर इंधनाचा वापर केला जाऊ शकतो. अंतराळ क्षेत्र भारतात 2020 मध्ये खासगी उद्योगांसाठी खुले करण्यात आले होते. हैदराबादमध्ये मुख्यालय असणाऱया स्कायरुट एअरोस्पेसमध्ये कमर्शियल सॅटेलाईट्स प्रक्षेपित करण्यासाठी अत्याधुनिक अंतराळ प्रक्षेपक निर्माण केला जातो.









