मध्यप्रदेशातील भाजप खासदाराचा अजब सल्ला
वृत्तसंस्था/ रीवा
भाजप खासदाराने पाण्याचे महत्त्व समजवताना केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठलेही व्यसन करा, परंतु सर्व खर्चांमध्ये कपात करत पाण्यावरील कर अवश्य भरा, आम्हा सर्वांना पाण्याचे महत्त्व समजून घ्यावे लागेल असे भाजप खासदाराने म्हटले आहे.
मध्यप्रदेशच्या रीवाचे भाजप खासदार जनार्दन मिश्र या विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. वीज बिल माफ होऊ शकते, मोफत धान्य देखील घेऊन जा, सरकार निवडताना मोठमोठी आश्वासन दिली जातात, परंतु जर कुणी मोफत पाणी देणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका असे मिश्र यांनी म्हटले आहे.
हवं तर दारू प्या, गुटखा खावा किंवा थिनरचा वास घ्या, परंतु पाण्यासाठी कर भरावा लागणार. सर्व खर्चांमध्ये कपात करत पाण्यावरील कर भरण्यात यावा असे खासदारांनी म्हटले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या जलसंरक्षण तसेच जल संवर्धन कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले आहे.
जलपातळी वेगाने खालावत असल्याने आम्हाला पाण्यावरील कर भरावा लागेल. नदी-ओढे कोरडे पडत चालले असून भूगर्भातही फारसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. परंतु आम्ही पाण्याचा वारेमाप वापर करत आहोत. प्रत्येक व्यक्तीला घरात स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सरकारने ’हर घर जल’ योजना लागू केली आहे. यात नागरिकांनीही सहकायं करावे. जलसमित्यांची स्थापना करत पाणी कर भरण्यात यावा, तरच ही योजना यशस्वी ठरणार असल्याचे विधान खासदाराने केले आहे.









