पिंपरी / प्रतिनिधी :
इतिहासाची मोडतोड करीत खोटा इतिहास दाखविण्यात येत असल्याचा आक्षेप नोंदवित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा खेळ संभाजी ब्रिगेडने पिंपरी-चिंचवडमध्ये अखेर बंद पाडला.
‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून मागच्या काही दिवसांत वातावरण तापले आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. संभाजी ब्रिगेडनेही आक्रमक भूमिका घेत पिंपरीतील विशाल ई-स्वेअर चित्रपटगृहात धडक मारली व या चित्रपटाचे खेळ बंद पाडले.
अधिक वाचा : मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रमास 9 नोव्हेंबरपासून प्रारंभ
याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे म्हणाले, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे. शूरवीरांच्या कर्तृत्ववाबद्दल खोडसाळपणा केला आहे. यात इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे. मराठय़ांच्या इतिहासाचा अपमान करण्यात आला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखविण्याचा मूर्खपणा यात केला आहे. याशिवाय अनेक अनैतिहासिक गोष्टी या चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाला आमचा तीव्र विरोध आहे. हा विरोध दर्शविण्याकरिताच आज ब्रिगेडकडून हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची स्क्रिप्टही संभाजी ब्रिगेडला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. अन्यथा, संभाजी ब्रिगेड हा चित्रपट चालू देणार नाही, असा इशाराही काळे यांनी दिला.








