शहरात संकल्प यात्रेचे आयोजन : सर्व विभागातील नोकर संघटनांचा पाठिंबा असल्याची घोषणा
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी निवृत्त कर्मचाऱयांना जुन्या पेन्शन योजनेनुसारच निवृत्ती वेतन देण्यात यावे. याकरिता विविध खात्यातील सरकारी नोकर रविवारी रस्त्यावर आले. जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी आणि नवीन पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करावी. या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे किल्ला येथील दुर्गामाता मंदिरपासून संकल्प यात्रा काढली. तसेच दि. 19 रोजी बेंगळूर येथे आंदोलन केले जाणार असून याला सर्व विभागातील नोकर संघटनांचा पाठिंबा असल्याची घोषणा करण्यात आली.
कर्नाटक राज्य नोकर संघटनेच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संकल्प यात्रा काढण्यात आली. किल्ला येथून प्रारंभ करून चन्नम्मा सर्कलमार्गे सरदार मैदानावर सांगता झाली. जुन्या निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱयांना चांगले निवृत्ती वेतन मिळत होते. त्यामुळे निवृत्तीनंतरचे जीवन व्यवस्थित चालत होते. पण 2010 पासून शासनाने एनपीएस योजनेंतर्गत वेतन देण्यास प्रारंभ केल्याने मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे या रकमेतून गुजरान करणे अडचणीचे जात आहे. त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेनुसारच निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशी मागणी सरकारी नोकर वर्गाच्यावतीने करण्यात येत आहे. याकरिता नोकर संघटनेतर्फे संकल्प यात्रेचे आयोजन केले होते. राज्यातील 39 विभागातील 2.5 लाख कर्मचाऱयांना नव्या पेन्शन योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे विविध खात्याचे सरकारी नोकर संकल्प यात्रेत सहभागी झाले होते.
आंदोलनाला सर्व नोकरसंघटनांचा पाठिंबा : रामू कोगवाड
जुन्या पेन्शनकरिता नोकर संघटनेने दि. 19 रोजी बेंगळूर येथे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला सर्व नोकरसंघटनांचा पाठिंबा आहे. त्या पार्श्वभूमिवर संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने निवृत्त कर्मचाऱयांसाठी जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी याकरिता हे आंदोलन असल्याचे कर्नाटक प्रौढ शाळा शिक्षण संघाचे रामू कोगवाड यांनी सांगितले.









