मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाहय़ कंत्राटी तत्वावर नेमणूक झालेल्या 11,136 पालिका कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उर्वरित दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील बेंगळूर आणि शहराबाहेरील शहरी भागातील कंत्राटी तत्वावरील पालिका कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. रविवारी बॅटरायनपूर विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पालिका कर्मचाऱयांचा आपत्कालीन निधी 2 हजारापर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाहय़ कंत्राटी तत्वावर काम करीत असलेल्यांना कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेतले जात आहेत. दलितांचे कल्याण करणे हे सरकारचे ध्येय आहे. यासाठी सर्वांनी एकजूट दाखविली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गौतम बुद्ध हे ज्ञानाचे प्रतिक आहेत. त्यांनी आपल्या राज्याचा त्याग करत ज्ञान प्राप्त करून जगाला सामाजिक आणि धार्मिक मूल्यांचा उपदेश केला. आंबेडकरांनी बुद्धाच्या मार्गावर चालत स्वतंत्र भारतात सर्वांना समान अधिकार देत जनजागृती केली, असेही ते म्हणाले.









