प्रतिनिधी/लातूर
लातूर जिल्ह्यात साखर कारखानदारीत देशमुख परिवाराचे निर्विवाद वर्चस्व आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची ऊस तोडणीवरून नाराजी होती. त्यावरून अनेक शेतकऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना साखर कारखानदारी सुरू करण्याचे साकडे घातले होते परंतु आजपर्यंत यश आले नाही. या हंगामात मात्र भाजपच्या आमदारांनी साखर कारखानदारीत प्रवेश करून देशमुखांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावरून लातूर जिल्ह्यात साखर कारखानदारीवरून सत्तासंघर्ष पाहावयास मिळत आहे.
नाईलास्तव शेतकऱ्यांना देशमुख परिवाराच्या कारखान्याशी मिळते-जुळते घ्यावे लागत होते. अनेकवेळा तक्रारी करूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकऱयांची मोठय़ा प्रमाणावर अडवणूक होत होती. याचे शल्य भाजपतील आमदारांना वाटत असे. परंतु त्यांचा नाईलाज होता. त्यात निलंगा तालुक्मयातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी कारखाना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ओमकार शुगर प्रा.लि. ला चालवायला देऊन साखर कारखानदारीत उडी घेतली आहे. तसेच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पुर्नशेअर्सची खरेदी करून कारखानदारीत प्रवेश सुरू केला आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड यांनी खासगी कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राजकारणात नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱयाची अडवणूक होत असे. परंतु नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कारखानदारांशी मिळते-जुळते घ्यावे लागत असे. कालच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मागच्या 12 वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करून पहिल्या गळीत हंगामाचे उद्घाटन केले. यावेळी कारखान्याचे चेअरमन बोत्रे पाटील यांनी आगामी काही दिवसातच सर्वाधिक भाव देणार असे जाहीर केले. तर मांजरा परिवारातील कारखान्यानेही आपल्या कारखान्याचे गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताच केला आहे. कारखानदारीच्या माध्यमातून जिह्यात यापुढील स्पर्धा सुरू राहील व जो कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देईल त्या कारखान्याच्या पाठीशी शेतकरी सभासद उभा राहतील असे बोलले जात आहे.