डिचोली वाहतूक पोलीस, सरपंचासह समिती सदस्यांची चर्चा
प्रतिनिधी / डिचोली
विठ्ठलापूर साखळीत सोम. दि. 7 नोव्हें. रोजी होणाऱया त्रिपुरारी पौर्णिमा व नौकानयन स्पर्धेसाठी येणाऱया वाहनांसाठी विठ्ठलापूर सांखळी परिसरात पार्किंगसाठी विविध जागा ठरविण्यात आली आहेत. त्यासाठी डिचोली वाहतूक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सरपंच, मुख्याधिकारी व समितिच्या सदस्यांनी पाहणी करून याविषयी चर्चा केली.
दोन वर्षांच्या खंडानंतर साखळीत होत असलेल्या या प्रसिध्द त्रिपुरारी उत्सवात दरवषी मोठी गर्दी उसळत असते. त्यामुळे वाहतूक पार्किंगची मोठी समस्या निर्माण होत असते. त्यावर यावषी नियंत्रण ठेवण्यासाठी डिचोली वाहतूक पोलीस निरिक्षक गौरीश मळीक, पोलीस निरीक्षक सुरज गावस, कारापूर सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, सांखळी नगरपालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, दिपावली उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश फातर्फेकर व इतरांनी परिसरची पाहणी केली.
त्रिपुरारी उत्सवासाठी विठ्ठलापूर येथे सध्या काम सुरू असलेल्या चंदन च्यारी यांच्या इमारतीत अतिमहनिय व्यक्तींच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवात येणाऱया लोकांसाठी कारापूर तिस्क येथील सती देवीच्या मंदिर परिसरात, कारापूर तिस्क येथे, दत्तवाडी येथे श्री दत्त मंदिराच्या परिसरात, दत्त मंदिरासमोरील मशीद परिसरात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच डिचोली येथून येणारी अवजड वाहने कारापूर तिस्क येथे अडवली जाणार आहेत. तर लहान चारचाकी वाहने बाजारातील पुलावरून वळवली जाणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने नीट हाकावी. वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणाऱया निर्देशांचे पालक करावे, असे आवाहन दीपावली समितीचे अध्यक्ष शैलेश फातर्फेकर यांनी केले आहे.









