आवक वाढल्याचा परिणाम ः बटाटा भाव स्थिर ः मोजक्याच भाजीपाल्यांच्या दरात वाढ
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा भाव 400 रुपयांनी तर रताळय़ाचा भाव 300 रुपयांनी प्रती क्विंटल कमी (उतरला) झाला आहे. बटाटा भाव स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत. तर मोजक्याच भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.
बाजारात आवक वाढल्याने मागील आठवडय़ाच्या तुलनेत कांद्याचा 400 तर रताळय़ाचा भाव 300 रुपयांनी घसरला आहे. मागच्या शनिवारी बाजारात कांदा भाव 1000 ते 3800 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर रताळी भाव 1400 ते 1600 रुपये झाला होता. मात्र आवक वाढल्याने आजच्या शनिवारच्या बाजारात कांदा प्रति क्विंटल 500 ते 3300 रुपये झाला तर रताळी दर 1000 ते 1300 रुपये झाला.
सध्या बेळगाव व खानापूर तालुक्यातील शेतकरी उन्हाळी (रब्बी) हंगामासाठी बटाटा लागवडीसाठी जवारी पांढरा मीडियम मोठवड बटाटा बियाणे म्हणून खरेदी करत आहेत. सदर बटाटा दर प्रति क्विंटल 1800 ते 2000 रुपये प्रमाणे खरेदी करत आहेत. सध्या बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा आवक संपत आली आहे. यंदा बटाटा लागवड देखील कमी झाली आहे. शनिवारी रताळी आवक जास्त प्रमाणात आल्याने रताळी दर कमी झाल्याची माहिती अडत व्यापारी बसवंत मायाण्णाचे यांनी दिली.
कांद्याची आवक दुप्पट झाल्याने दरांवर परिणाम
मागच्या शनिवारी कांद्याचा भाव वाढल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातून कांद्याची आवक दुप्पट प्रमाणात झाली. त्यामुळे कांद्याचा भाव 400 रुपयांनी कमी झाल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे 1-2 महिन्यापूर्वी केलेली भाजीपाला लागवड जिल्हय़ामधून मोठय़ा प्रमाणात येत आहे. चांगल्या
प्रतिच्या भाजीपाल्याने गोवा, कारवार, कोकण पट्टय़ातील खरेदीदार चांगल्या भावाने खरेदी करत आहेत. यामुळे काही भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. तर मोजकेच भाजीपाला दर वाढले आहेत, अशी माहिती भाजी व्यापाऱयांनी दिली.









