वृत्तसंस्था/ लॉसेनी
2026 साली होणाऱया पुरुष आणि महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धांचे संयुक्त यजमानपद बेल्जियम आणि नेदरलँड्स भूषविणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये वरील निर्णय घेण्यात आला. या बैठकीवेळी अध्यक्षस्थान सैफ अहमद यांनी भूषविले होते. 2026 च्या जुलै किंवा ऑगस्ट दरम्यान सदर स्पर्धा घेतली जाईल, असेही सांगण्यात आले. नेदरलँड्समधील ऍमस्टरडॅम आणि ऍमस्टेलविन या शहरांमध्ये तसेच बेल्जियमच्या वेविरे या शहरात सदर स्पर्धेतील सामने खेळविले जातील. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची आगामी पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात होणार आहे. आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीची पुढील बैठक 28 जानेवारी रोजी घेतली जाईल.









