राज्यसभेवरील वर्णीसाठी 50 कोटी घेतल्याचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या मंडोली तुरुंगात कैद असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने मीडियाला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तीन पानांच्या पत्रात सुकेशने ‘जर मी ठग आहे, तर केजरीवाल महाठग आहेत’ असे थेट लिखित आरोप केला आहे. राज्यसभेच्या जागेच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडे 50 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचा दावा करत याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, असे सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल 2016 मध्ये एका डिनर पार्टीलाही आले होते. त्यांच्या सांगण्यावरून मी असोला येथील फार्म हाऊसवर जाऊन कैलाश गेहलोत यांच्याकडे 50 कोटी रुपये दिले होते. कैलाश सध्या केजरीवाल सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत. मी दिलेली ही सर्व माहिती खरी असून त्याची चौकशी होऊ शकते असे सुकेशने म्हटले आहे. सुकेशने प्रसारमाध्यमांना तीन पानी पत्र पाठवले असून त्यात विविध आरोप आणि दावो करण्यात आले आहेत.
सुकेशने आपल्या यापूर्वीही वेगवेगळे आरोप केले होते. 1 नोव्हेंबर रोजी त्यांनी दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र लिहिले. तुरुंगात सुविधा देण्याच्या बदल्यात केजरीवाल सरकारने तुरुंगातील मंत्री सत्येंद्र जैन यांना 10 कोटी रुपये दिल्याचे सांगण्यात आले. लेफ्टनंट गव्हर्नरकडे तक्रार केल्यानंतर सत्येंद्र जैन आणि जेलचे तत्कालीन डीजी आपल्याला धमकावत असल्याचेही सुकेशने म्हटले आहे. सुकेशच्या या दाव्याला त्याच्या वकिलांनी दुजोरा दिला आहे. 1 नोव्हेंबर रोजी सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहून दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
सुकेशच्या आरोपावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गुजरातमध्ये आपने जोरदार प्रचारमोहीम चालवल्यामुळे आता पराभवाच्या भीतीने भाजपने तिहारमध्ये कैद असलेल्या गुंडांशी संगनमत केले आहे, असे शिसोदिया म्हणाले.









