निवडणूक हरण्याच्या भीतीमुळेच छापासत्राचा ‘आप’चा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या निकटवर्तीयांवर छापा टाकून कारवाई करण्याचा सपाटा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरूच ठेवला आहे. शिसोदिया यांच्या पीएच्या घरावर शनिवारी छापा टाकून त्याची चौकशी करण्यात आली. शिसोदिया यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली असून ‘आज माझ्या पीएच्या घरावर ईडीने छापा टाकला, मात्र तेथे त्यांना काहीही मिळाले नाही. तरीही माझ्या पीएला अटक झाली,’ असे म्हटले आहे. दुसरीकडे, मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांच्या पीएला ताब्यात घेऊन जबाब नोंदवण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले.
ईडीने बनावट एफआयआरद्वारे माझ्या घरावर छापा टाकला, बँक लॉकर्सची झडती घेतली, माझ्या सर्व मालमत्तांची चौकशी केली पण माझ्याविरुद्ध काहीही सबळ पुरावे त्यांना आढळले नाहीत. आज माझ्या पीएच्या घरावर ईडीने छापा टाकला आणि तेथे काहीही सापडले नाही. तरीही त्यांनी पीएला अटक केली आणि घेऊन गेले. भाजपवाल्यांना निवडणूक हरण्याची भीती आहे. त्यामुळेच ते कारवाईचा तगादा लावून आमच्या वाटचालीत अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिसोदिया यांनी केला आहे.









