छोटे राज्य असल्याने काँग्रेसकडून दुर्लक्ष : पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
वृत्तसंस्था/ सुंदरनगर
हिमाचलप्रदेशमध्ये लोकसभेच्या केवळ चार जागा असल्याने काँग्रेसने या राज्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. राज्यांकडे बघण्याचा काँग्रेसचा हेतू केवळ राजकीय लाभासाठीचाच असल्याने छोटय़ा राज्यांकडे या पक्षाने आपल्या त्याच्या सत्ताकाळात सातत्याने सापत्न भावाची दृष्टी ठेवली. भाजप सरकारने मात्र राज्यांचे आकारमान किंवा त्या राज्यातील लोकसभेच्या जागांची संख्या याकडे लक्ष न देता जनहिताला प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
हिमाचल प्रदेशमधील सुंदरनगर येथे ते जाहीर सभेत बोलत होते. 12 नोव्हेंबर हिमाचलप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या दिवशी घातलेले जाणारे प्रत्येक मत राज्याच्या पुढील 25 वर्षांच्या विकासाची दिशा ठरविणारे असेल. हिमाचल प्रदेशमधील जनतेने भाजपला पुन्हा सत्तेवर आणल्यास विकासाचा मार्ग मोकळा होईल. दर पाच वर्षांनी वेगळे सरकार देण्याची परंपरा यावेळी या राज्यातील जनतेने मोडावी, असे आवाहन त्यांनी केले.
डबल इंजिनचा लाभ
केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याचा लाभ हिमाचल प्रदेशला गेल्या पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. विरोधी पक्षांच्या अनेक दशकांच्या सत्ताकाळात जी विकासकामे होऊ शकली नव्हती ती भाजप सरकारने पाच वर्षात करून दाखवली आहे. राज्यातील जनतेला याची पुरेपूर जाणीव आहे. राज्यातील कामांबरोबरच राष्ट्रीय पातळीवरही भाजपने देशहिताचे निर्णय घेतले आहेत. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील 370 वा अनुच्छेद निष्प्रभ करण्याचे शिवधनुष्य भाजपनेच उचलले आहे. त्याचप्रमाणे अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राम मंदिराचे भारतीयांचे स्वप्न भाजपच पूर्ण करीत आहे. त्यामुळे मतदारांनी भाजपला राज्यात पुन्हा एकदा संधी द्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भ्रष्टाचारमुक्त राज्य
केंद्रात आणि राज्यांमध्ये भाजपने भ्रष्टाचारमुक्त राजवट दिली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात प्रत्येक सरकारी कामात दलालीचा सुळसुळाट झाला होता. संरक्षण व्यवहारांमध्येही दलाली दिली आणि घेतली जात होती. हजारो कोटी रुपयांचे घोटाळे घडलेले होते. मात्र, भाजपने ही भ्रष्टाचार संस्कृती मोडीत काढली असून अत्यंत पारदर्शी पद्धतीने संरक्षण व्यवहार केले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
वन रँक वन पेन्शन
सेनेतील अधिकारी आणि सैनिकांना वन रँक वन पेन्शनचे आश्वासन काँग्रेसने 40 वर्षे दिले. तथापि ते पूर्ण करण्याच्या दिशेने कोणतीही हालचाल न करून जनतेची आणि निवृत्त सेनाधिकारी तसेच सैनिकांची फसवणूक केली. भाजपने मात्र आपल्या निवडणूक वचन पत्रात आश्वासन दिल्याप्रमाणे सत्तेवर येताच वन रँक वन पेन्शनचे स्वप्न साकार केले. भाजप हा पोकळ आश्वासने देणार पक्ष नाही. दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.
हिमाचलातील पक्षबांधणी
अनेक वर्षांपूर्वी मी स्वतः हिमाचल प्रदेशमध्ये संघटना बांधणी करणारा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा यांचा उत्तम परिचय मला आहे. आणखी 25 वर्षांनी भारत आपल्या स्वतंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशदेखील आपल्या स्थापनेची शंभर वर्षे साजरी करेल. यासाठी राज्यात स्थिर आणि वेगवान काम करणारे सरकार आवश्यक आहे, याची मतदारांना जाणीव आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
हिमाचलात तिहेरी चुरस
हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षांसह यावेळी आम आदमी पक्षानेही गंभीरपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात तिरंगी चुरस पाहावयास मिळणार आहे. मतगणना 8 डिसेंबर या दिवशी होत आहे.









