गेल्या आठवडय़ात पंचांगाप्रमाणे साजरी होणारी दिवाळी संपली आहे. तथापि, उत्तराखंडमध्ये पारंपरिक दिवाळीच्या 11 दिवसानंतर दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. उत्तराखंड हा पहाडी प्रदेश असून त्याच्या प्रत्येक भागात पहाडी संस्कृतीचा प्रभाव आहे. पहाडी लोकसंस्कृतीमध्ये ही दिवाळीनंतरची दिवाळी मोठय़ा प्रमाणावर साजरी केली जाते. या दिवाळीला लोकपर्व इगास बगवाल म्हणून ओळखले जाते. इगास बगवालमध्ये भैलो नामक पारंपरिक नृत्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच या दिवाळीला वैशिष्टय़पूर्ण आणि पारंपरिक पहाडी खाद्यपदार्थांची रेलचेल असते. यंदाही उत्तराखंडमध्ये ही दिवाळी उत्साहात साजरी केली जाणार आहे.

ही निसर्गस्नेही दिवाळी असते. कारण फटाके आणि आतषबाजी यांना या दिवाळीत पूर्णपणे फाटा दिलेला असतो. फटाक्मयांऐवजी पारंपरिक लाकडांपासून बनविलेली वाद्ये घरोघरी आणि रस्तोरस्ती वाजविली जातात. ही वाद्ये तयार करणारी विशिष्ट घराणी आहेत. उत्तराखंड सरकार या दिवाळीलाही सुटी घोषित करते. या दिवाळीत पाळीव जनावरांचाही समावेश असतो. बैलांची पूजा हा महत्त्वाचा भाग असतो. तथापि, गेल्या काही वर्षात पहाडी भागातून बैलांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. हा चिंतेचा विषय असल्याचे गावकऱयांचे म्हणणे आहे. या दिवाळीत भैलो नामक खेळ खेळला जातो. भैलो हे साधन ज्वलनशील लाकडापासून बनविले जाते. लोक या लाकडांचे छोटे छोटे तुकडे आपल्या शरीराभोवती बांधून घेतात आणि त्यांचे ज्वलन केले जाते. तशा स्थितीत लोक नृत्य करतात. ‘अशी जळणारी माणसे’ बघण्यासाठी बघ्यांचीही गर्दी प्रचंड झालेली असते. अशी वैशिष्टय़पूर्ण दिवाळी जगात कोठेही नाही, असेही मानले जाते.









