अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार यांची मागणी; ८२ व्या वाढदिनी दादरमध्ये सत्कार
मुंबई प्रतिनिधी
मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर अनेकदा संघर्ष केले. बहुतेक वेळा त्याची चांगलीच फळे मिळाली. पण आता राज्यात सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे यांचे सरकार हे राज्याच्या इतिहासातील सर्वात गतिमान सरकार आहे. या सरकारने माझ्या आयुष्याच्या अखेरीस मराठा समाजाला तातडीने ओबीसी कोटय़ामधून आरक्षण द्यावे व तेच पाहण्याची एकमेव इच्छा उरली असल्याचे भावोत्कट उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांनी काढले.
ऍड. पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित त्यांचा शुक्रवारी हृद्य सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दादर येथील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बिनव्याजी 10 हजार,50 हजार व एक लाख इतके कुठल्याही फार मोठय़ा कागद पत्राशिवाय कर्ज देणे तसेच मराठा विद्यार्थ्यांना सारथी संस्थे मार्फत रुपये 60 हजार इतका निर्वाह भत्ता असे उपक्रम राज्य सरकारने सुरू केले आहेत. त्याची अंमलबजावणी सुद्धा लगेच सुरू झाली आहे. याबाबत पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मंत्रिमंडळ उप समितीचे अध्यक्ष,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे जाहीर कौतुक केले. मराठा समाजातील तरुणासाठी सकारात्मक निर्णय होत असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या मराठा समाजाप्रती असलेल्या भावना अधोरेखित होत आहेत. त्यांनी आता मराठा समाजाला त्वरेने ओबीसी कोटय़ातून आरक्षण देण्याची मागणीही पूर्ण करावी. याच मार्गाने मराठा समाजाला त्वरेने आरक्षण मिळू शकेल. अन्यथा मराठा समाजाची ही मागणी न्यायालयीन प्रक्रियेत बराच काळ प्रलंबित राहील, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
निर्णय झाला तर ठिक अन्यथा आंदोलन
मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाचे असल्याने ते आरक्षणाची ही मागणी मान्य करतील. पण त्यांनी हा निर्णय लवकर घेतला नाही तर याच मागणीसाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याची आपली तयारी असल्याचे ऍड. पवार यांनी स्पष्ट केले.