एखाद्या हॉररपटातील पात्रासारखा चेहरा
एक छोटीशी मुंगी आमच्या नजरेत न पडल्याने कित्येकदा ती आपल्या पायांखाली सापडून चिरडली जाते. परंतु याच मुंगीने चावा घेतल्यावर होणाऱया वेदना सर्वांनाच माहित असाव्यात. अलिकडेच या प्राण्याचे क्लोजअप छायाचित्र समोर आले आहे. लिथुआनियाचे वाइल्डलाइफ फोटोग्राफर यूजीनियस कवलियाउस्कास यांनी हे छायाचित्र काढले आहे. या छायाचित्रात मुंगीचे भयानक रुप दिसून येते.
कवलियाउस्कास यांनी हे छायाचित्र 2022 च्या निकॉन स्मॉल वर्ल्ड फोटोमायक्रोग्राफी स्पर्धेत सादर केले होते. मी एका जंगलानजीक राहत असल्याने मला सहजपणे मुंगीचे क्लोजअप छायाचित्र घेता आले. मुंगीची छायाचित्र अत्यंत जवळून घेतल्याने त्याच्या चेहऱयाचे स्वरुप स्पष्टपणे कैद झाल्याचे कवलियाउस्कास यांनी सांगितले आहे.

क्लोजअप छायाचित्रात मुंगी एखाद्या हॉररपटात दाखविण्यात आलेल्या जीवासारखी भासत आहे. कवलियाउस्कास यांनी या छायाचित्राला कॅम्पोनोटस असे नाव दिले आहे. स्पर्धेतील परीक्षकांनी या भयानक परंतु उत्तम छायाचित्राला ‘इमेजिस ऑफ डिस्टिंक्शन’ श्रेणीत सामील करत पारितोषिक दिले आहे.
सोशल मीडियावर मुंगीचे हे छायाचित्र वेगाने व्हायरल होत आहे. याला वेगवेगळय़ा अकौंट्सवरून शेअर करण्यात येत आहे. एंटमॅन हॉररपट असायला हवा होता असे एक युजरने म्हटले आहे. आतापर्यंत मुंग्यांना मी निष्पाप मानत होतो, परंतु आता मला त्यांची भीती वाटू लागेल असे दुसऱया एका युजरने नमूद केले आहे.









