स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूरात 3 कोटीं रुपये किमतीची व्हेल माशाची उल्टीची तस्करी करणाऱ्या तीघांना अटक केली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज पुणे- बेंगऴूर महामार्गालगत सरनोबतवाडीजवळ सापला रचून ही कारवाई केली. त्यांच्याकडून 3 किलो उल्टीसह एकूण 3 कोटी 44 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सुत्राकडून व्हेल माशाची उलटी घेऊन काही युवक सरनोबतवाडी इथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्याने करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथे सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे पोलीस अंमलदार श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, अनिल पास्ते, दीपक घोरपडे, सोमराज पाटील यांच्यासह वनअधिकाऱ्यांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. संशयित आले असता त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिघांकडे व्हेल माशाची उलटी आढळून आली. त्यांच्याकडून 3 किलो 473 ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उलटी यांच्यासह हुंडाई असेंट कार असा एकूण 3 कोटी 44 लाख 65 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच प्रदीप श्याम भालेराव, शकील मोईन शेख, अमीर हाजू पठाण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.