पेडणेत धरणे आंदोलनकर्त्यांची एकमुखी मागणी : भाऊसाहेबांची तुलना इतर कुणाशीही नको : सर्व पक्षियांनी एकसंघपणे समर्थन देण्याचे आवाहन
प्रतिनिधी / पेडणे
गोव्याचे भाग्यविधाते आणि पेडण्याचे सुपुत्र ज्यांनी गोव्य़ासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती केली. गोवा मुक्तीनंतर गोव्याची ओळख आपल्या कार्यातून जागतिक स्तरावर नेली, असे लोकनायक भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय मोप विमानतळाचे नामकरण समितीच्या धरणे आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्यासह इतर मान्यवरांनी केली. भाऊसाहेबांचे नाव न दिल्यास इतर कोणाच्याही नावाने विमानतळाचे नामकरण करू देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
पेडणे तालुक्मयातील विमानतळासाठी भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव की मनोहर पर्रीकर यांचे नाव, असा सध्या वाद सुरू आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने काल गुरुवारी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते, या आंदोलनात वरील इशारा देण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील आंदोलकांनी केवळ भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव विमानतळाला देऊन हा वाद कायमचा मिटवावा. या विमानतळ प्रकल्पाला राजकारणाचा रंग देण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, प्राचार्य सुभाष वेलिंगकर, नामकरण समितीचे निमंत्रक सुभाष केरकर, शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत, बोडगेश्वर शेतकरी समितीचे अध्यक्ष संजय बर्डे, बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणेकर, कूळ मुंडकार संघटनेचे अध्यक्ष डॅनियल डिसोजा, झिला उर्फ नारायण मयेकर, उदय महाले, नारायण गडेकर, माजी शिवसेना अध्यक्ष रमेश नाईक, उमेश गाड, दीपेश नाईक, अमृत आगरवाडेकर आदी नेत्यांसह अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाऊंच्या जागी प्रति भाऊ नको ः वेलिंगकर
प्राचार्य सुभाष वेलिंगकर यावेळी म्हणाले, ज्या भाऊसाहेब बांदोडकर यांनी केलेले कार्य आजच्या राज्यकर्त्यांना समजत नाही, त्यांची तुलना कोणाशी होऊ नये. प्रति भाऊ तयार करायला काहीजण प्रयत्न करत आहेत. भाऊसाहेब हे नैतिकेचा मानदंड होते. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी पगार, गाडी घेतली नाही. अशा व्यक्तीचा आदर्श घ्यायचा सोडून जे लुबाडण्यसाठी आहेत त्यांचा आदर्श गोव्याच्या जनतेने घ्यायचा का? जे राजकर्त्यांनी भाऊसाहेब यांच्या गुणांची कदर करू शकत नाहीत, त्यांनी यावर बोलूच नये, भाऊसाहेब बांदोडकरांचे कर्तुत्व आणि त्यांनी केलेले कार्य त्या कार्याची पोचपावती आणि त्यांचा सन्मान म्हणून मोप विमानतळाला केवळ त्यांचेच नाव द्यावे.
भाऊसाहेबांच्या समाधीचा विस्तार करावा
भाऊसाहेबांच्या समाधीचा आजपर्यंत सरकारने विस्तार केला नाही. तो विस्तार करून त्या ठिकाणी एखादा प्रकल्प आणि भाऊसाहेबांची पूर्व माहिती, माहितीपट तैलचित्र अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रकल्प उभारून खऱया अर्थाने भाऊसाहेब बांदोडकर यांना श्रद्धांजली द्यावी अशी मागणी सुभाष वेलिंगकर यांनी केली.
भाऊसाहेबांच्या नावाला समर्थन द्यावे ः खलप
गोव्यातील सर्व आमदार, मंत्री तसेच तिन्ही खासदारांनी भाऊसाहेब बांदोडकर यांचे मोप विमानतळ प्रकल्पाला नाव देण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून एकसंघ होऊन लोकनेते बाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्यासाठी समर्थन द्यावे, असे आवाहन ऍड. रमाकांत खलप यांनी केले.
पेडणेतील दोन्ही आमदारांनी समर्थन द्यावे
उमेश तळवणेकर यांनी मांदेचे मगोचे आमदार जित आरोलकर, व पेडणेचे आमदार प्रवीण आरोलकर यांनी भाऊसाहेबांच्या नावाला समर्थन द्यावे असे आवाहन केले.
अन्यथा प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा
शिवसेनेचे नेते तथा नामकरण समितीचे निमंत्रक सुभाष केरकर, डेनियल डिसोझा, ऍड. महेश राणे, महादेव गवंडी, उमेश गाड, संजय बर्डे, दीपेश नाईक, विनायक च्यारी, प्रा. गजानन मांजरेकर यांनी भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव वगळून इतर जर कुणाचे नाव मोपा विमानतळाला दिले तर प्रखर आंदोलन पेडणे तालुक्मयातून केले जाईल असाही दिला.
आंदोलकर्त्यांनी यावेळी पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांना निवेदन सादर करून मोपा विमानतळासाठी केवळ भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी केली.









