गोगटे चौकपासून पहिल्या रेल्वेगेटपर्यंत फुटपाथ गायब : फुटपाथवर व्यावसायिक-वाहनधारकांचेही अतिक्रमण
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेस रोडचे रुंदीकरण करून विकास करण्यात आला आहे. दुतर्फा फुटपाथ आणि मध्यभागी दुभाजक घालण्यात आले. मात्र, सध्या गोगटे चौक ते तिसऱया रेल्वेगेटपर्यंतच्या एका बाजूचा फुटपाथ झाडाझुडपांनी व्यापला आहे. त्यातच ठिकठिकाणी काही व्यावसायिकांनी ठाण मांडल्याने फुटपाथ नेमके कुणासाठी? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
फुटपाथ निर्माण करण्यासाठी कोटय़वधी निधी खर्ची घालण्यात आला. पण बहुतांश रस्त्याशेजारी फुटपाथवर व्यावसायिकांनी आणि वाहनधारकांनी अतिक्रमण केले आहे. काँग्रेस रोडशेजारी असलेले फुटपाथ कुचकामी बनले आहेत. गोगटे चौक ते तिसऱया रेल्वेगेटपर्यंतच्या रेल्वेट्रकशेजारी निर्माण करण्यात आलेल्या फुटपाथवर झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे गोगटे चौकपासून पहिल्या रेल्वेगेटपर्यंतचा फुटपाथ गायब झाला आहे.
खर्ची घातलेला निधी वाया गेला
पुढील फुटपाथवर मातीचे ढिगारे तर काही ठिकाणी व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे पादचाऱयांना फुटपाथचा वापर करता येत नाही. अशातच फुटपाथवर डेकोरेटिव्ह दिवे बसविण्यात आले आहेत. दुसऱया बाजूच्या फुटपाथवरून नागरिक ये-जा करीत असतात. फुटपाथकरिता इतका निधी खर्च करूनदेखील फुटपाथचा वापर होत नसल्याने खर्ची घातलेला निधी वाया गेला असून फुटपाथ नेमके कुणासाठी, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी फुटपाथ निर्माण केले जात आहेत का? असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत. महापालिकेने फुटपाथवरील झाडेझुडपे आणि अतिक्रमणे हटवून मोकळी करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









