आघाडीला मिळाले बहुमत : भारतासोबत मुक्त व्यापार कराराची शक्यता
वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतमोजणी पार पडली असून यात माजी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या लिकुड पार्टीला सर्वाधिक मते मिळाली आहेत. लिकुड पार्टीला मतांच्या आधारावर आता 32 जागा मिळणार आहेत. कट्टरवादी अणि रुढिवादी ज्यू पक्षांसोबत मिळून लिकुड पार्टीला बहुमत प्राप्त करता येणार आहे.
या निवडणुकीत 40 राजकीय पक्षांना 3.25 टक्के मते न मिळाल्याने त्यांना नेसेट (संसद)मध्ये पोहोचता येणार नाही. नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे आता निश्चित झाल्याने पॅलेस्टिनींना रोखण्यासाठी त्यांच्या सरकारकडून सीमेवर भिंत उभारण्याच्या कामाला गती मिळू शकते. दहशतवाद विरोधात झिरो टॉलरन्सचे धोरण प्रभावीपणे लागू करण्यासाठी सीमेवर भिंत आवश्यक असल्याचे नेतान्याहू यांचे मानणे आहे.
इस्रायलच्या संसदेत एकूण 120 जागा असून नेतान्याहू यांची लिकुड पार्टी आणि त्यांच्या सहकाऱयांना यातील 65 जागा मिळणार आहेत. नेतान्याहू यांच्या आघाडीत 65 एमके (इस्रायलच्या संसदेचे सदस्य) सामील असतील. तर लॅपिड यांच्या आघाडीत 50 तर हदाश-ताल आघाडीत 5 सदस्य सामील असणार आहेत. लिकुड पार्टीला 32, येश अतीदला 24, धार्मिक जियोनिजम पार्टीला 14, नॅशनल युनिटी पार्टीला 12, शास पार्टी 11, युनायटेड टोरा ज्यू पार्टी 8, राम पार्टी 5, हदाश-ताल पार्टीला 5 जागा मिळणार आहेत. अरब वंशीयांचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱया अरब पक्षांना या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे.
नेतान्याहू यांच्या आघाडीत केवळ 8 महिला नेत्यांचा समावेश आहे. इस्रायलमधील अल्ट्रा-रुढिवादी राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देत नाहीत. तर वर्तमान सरकारमध्ये 30 महिलांचा समावेश होता. 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच नेसेटमध्ये अल्पसंख्याक ड्रूज धर्माचा कुठलाच प्रतिनिधी नसणार आहे.
धार्मिक जियोनिजम पार्टीचे नेते आणि नेतान्याहू यांच्या आघाडीतील सहकारी बेन ग्विर यांनी नव्या सरकारमध्ये स्वतःला अंतर्गत सुरक्षा मंत्री करण्याची मागणी केली आहे. बेन यांना 2007 मध्ये वंशवादाला चिथावणी दिल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. प्रतिबंधित कच दहशतवादी गटाचे ते समर्थक देखील राहिले आहेत.
भारतासोबत मैत्रीचे संबंध
नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान झाल्याने भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश दहशतवादविरोधात तसेच तंत्रज्ञान आणि द्विपक्षीय व्यापारावर पुन्हा एकत्र काम करू शकतात. दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करार होण्याचीही शक्यता आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक स्तरावर अत्यंत उत्तम संबंध आहेत. इस्रायलचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले होते. 5 वर्षांपूर्वी नेतान्याहू हे भारत दौऱयावर आले होते.
वादग्रस्त पार्श्वभूमीवर
2019 मध्ये नेतान्याहू यांच्यावर लाचखोरी, फसवणुकीचा आरोप झाला होता. नेतान्याहू हे इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिले आहेत. त्यांनी एकूण 15 वर्षांपर्यंत हे पद भूषविले आहे. मागील वर्षी त्यांना सत्तेवरून हटावे लागले होते.









