सर्वेक्षणानंतर मिळणार मालकीच्या मालमत्तांची एकूण आकडेवारी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील महापालिकेच्या मालमत्तांची माहिती नोंद करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत 1500 हून अधिक मनपाच्या मालमत्तांची माहिती घेण्यात आली आहे. सध्या पाणीपुरवठा मंडळाकडे हस्तांतर केलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येत असून अद्याप खुल्या जागा आणि उद्यानांचे सर्वेक्षण करण्याचे काम शिल्लक आहे.
महापालिका मालकीच्या असंख्य मालमत्ता असून याची नोंद प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये करण्यात आली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तांसंदर्भात न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास मालमत्तांची माहिती देताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तांची माहिती नोंद करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली होती. त्यानुसार शहर आणि उपनगरांतील मुख्य कार्यालयासह विभागीय कार्यालये, व्यापारी संकुल, उद्यान, स्मशानभूमी, खुल्या जागा, रस्ते, विहिरी, कूपनलिका, लीजवर दिलेल्या मालमत्ता, समुदाय भवन आदींसह सर्व मालमत्तांची माहिती घेतली जात आहे. जागेच्या आकाराचे मोजमाप घेऊन सविस्तर माहिती नोंद केली जात आहे. आतापर्यंत 1500 हून अधिक मालमत्तांची माहिती घेण्यात आली आहे.
इस्टेट ऑफिसर पदावर अधिकाऱयांची नियुक्ती करून अभियंते व अधिकाऱयांकडे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मालमत्तांची नोंद महसूल विभागामार्फत ठेवली जाते. त्यामुळे मनपाचे महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर यांच्या नेतृत्वाखाली मालमत्तांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडे खुल्या जागा हस्तांतर करण्यात आल्या होत्या. तसेच जलकुंभ व अन्य मालमत्ता पाणीपुरवठा विभागाकडे सोपविण्यात आल्या होत्या. पण सध्या चोवीस तास पाणी योजनेंतर्गत या मालमत्ता एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मालमत्तांची माहिती घेऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच काही खुल्या जागांचे सर्वेक्षण करण्याचे काम शिल्लक आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मनपाच्या मालमत्ता नेमक्मया किती? याची माहिती उपलब्ध होणार आहे.









