प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातून पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या दहा बारा दिवसात परजिह्यातून शोधून कायदेशीर सोपस्कार पार पाडून फिर्यादी मूळ मालकास परत करण्यात आली.
जिह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत तातडीच्या कारवाईची सूचना केली होती. त्यानुसार सातारा शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी हि अशा फिर्यादीची जलदगतीने निर्गती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि 16 सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय शेजारील मशिदी समोरून दुपारी एक ते दिड दरम्यान दुचाकी ऍक्टिव्ह क्र एम एच 11 ए इ 6582 हि अज्ञाताने चोरल्याची फिर्याद आयुब नूरमोहम्मद शेख (रा. पंतांचा गोट सातारा) यांनी दिली होती. या बाबतीत राज्यातील सर्व पोलीस ठाण्यास कळविण्यात आले होते.
चोरीस गेलेली दुचाकी यादवनगर कोल्हापूर या ठिकाणी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर यांना मिळाली. या माहितीनुसार दि. 14 ऑक्टोबर रोजी सापळा रचून नंबर नसलेली दुचाकी चालविताना संशयित रेकॉर्ड वरील गुन्हेगार एजाज दिलावर शेख यास ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान सादर दुचाकी हि त्याने सातारा येथून चोरल्याची कबुली दिली.
सातारा शहर पोलिसांनी सादर जप्त केलेले वाहन कोल्हापूर येऊन हस्तगत करत संपूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करून आज मूळ मालक अय्युब शेख यांनी परत केली. यावेळी शेख यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले त्यांनी यावेळी सातारा पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व मुद्देमाल कारकून झंझुरने यांचे आभार मानले.








