वृत्तसंस्था/ पॅरिस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरिस मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सीडेड नोव्हॅक जोकोव्हिचने एकेरीत विजयी सलामी देताना क्रिसेचा पराभव केला. तर दुसऱया एका सामन्यात नवोदित रुनेने स्वीसच्या वावरिंकाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का दिला.
पॅरिस मास्टर्स इनडोअर टेनिस स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात जोकोव्हिचने अमेरिकेच्या पेसीचा 7-6 (7-1), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. गेल्या ऑक्टोबरमध्ये जोकोव्हिचने पाठोपाठ इनडोअर टेनिस स्पर्धा जिंकल्या होत्या. नॉर्वेच्या तृतीय मानांकित कास्पर रुडने फ्रान्सच्या गॅस्केटचे आव्हान 6-1, 7-6 (9-7) अशा सेट्समध्ये 84 मिनिटांच्या कालावधीत संपुष्टात आणत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात नॉर्वेच्या रुडने 11 विजयी फटक्मयांची नोंद केली. गेल्या वषी झालेल्या या स्पर्धेत रुडने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. आता रुडचा पुढील फेरीतील सामना बॅसिलासेव्हेली किंवा इटलीच्या मुसेटीबरोबर होईल. डेन्मार्कच्या होल्गेर रुनेने तब्बल अडीच तास चाललेल्या सामन्यात स्वीसच्या अनुभवी वावरिंकाचा 4-6, 7-5, 7-6 (7-3) असा पराभव करत विजयी सलामी दिली. रुनेने अलीकडच्या कालावधीत 16 पैकी 14 सामने जिंकले आहेत. पोलंडच्या हुबर्ट हुरकेझने फ्रान्सच्या मॅनेरिनोचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.









