एआय तंत्रज्ञानाद्वारे मधमाशी-हत्तीची भाषा समजणार
प्राण्यांशी संवाद साधण्यास आम्ही लवकरच सक्षम होऊ शकतो. जगभरातील वैज्ञानिक आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या (एआय) मदतीने मधमाशी, हत्ती आणि व्हेल माशाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या अनोख्या तंत्रज्ञानाचे काही तोटे देखली आहेत. एआयच्या शक्तीद्वारे आम्ही वन्यप्राण्यांना स्वतःच्या लाभासाठी नियंत्रित करू शकतो असे तज्ञांचे मानणे आहे.
जर्मनीत एका संशोधक पथकाने बिगरमानवी आवाजांना डिकोट करण्यास यश मिळविले आहे. एआयच्या मदतीने मधमाशांचा आवाज अन् हत्तींचा लो-फ्रीक्वेंसी आवाज समजून घेण्यास त्यांना यश मिळाले आहे. या तंत्रज्ञानाने आता प्राण्यांशी संवाद साधण्यासह त्यांना नियंत्रितही करता येणार असल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या प्राध्यापिका कॅरन बॅकर यांनी सांगितले आहे.
गैरवापर होण्याची भीती
प्राण्यांशी संवाद साधण्यास मदत करणारे एआय तंत्रज्ञान भविष्यात रोबोट्समध्ये वापरले जाऊ शकते, यातून दोन प्रजातींदरम्यान कम्युनिकेशनला चालना मिळणार आहे. हे मोठे यश असले तरीही काही नैतिक प्रश्न उपस्थित होणार असल्याचे बॅकर यांनी म्हटले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांना नियंत्रित करण्याची किंवा त्यांच्या जीवनात फेरफार करण्याचा विचार बळावू शकतो. वन्यप्राण्यांना आतापर्यंत पूर्णपणे पाळीव करणे शक्य झालेले नाही, परंतु त्यांच्यावर प्रभुत्व मिळविण्याचा विचार धोकादायक ठरू शकतो.
मधमाशांना पाडले गोंधळात
2018 मध्ये जर्मनीच्या डेहलम सेंटर फॉर मशीन लर्निंग अँड रोबोटिक्सने एक रोबो-बी तयार केली होती. रोबो बी ही मधमाशांप्रमाणेच हालचाली करू शकत होती. मधमाशांमध्ये परस्परांशी संवाद साधण्याची हीच मुख्य पद्धत आहे. एका प्रयोगात रोबो बीला खऱया मधमाशांमध्ये सोडण्यात आले होते. रोबो बी मधमाशांमध्ये गोंधळ निर्माण करण्यास यशस्वी ठरली होती.

व्हेलशी संवाद साधणार
ऑक्टोबर 2021 मध्ये स्पर्म व्हेलशी संवाद साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका पथकाने सीईटीआय प्रकल्प हाती घेतला होता. याच्या अंतर्गत मानवी भाषेला व्हेल माशाच्या भाषेशी जोडले जाणार होते. हा प्रयोग 5 वर्षांपर्यंत चालणार आहे, त्यानंतर एक रोबोट तयार करत तो समुद्रात सोडून व्हेलशी संवाद साधण्याचा प्रयत्न होणार आहे.









