वार्ताहर /सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे शॉर्टसर्किटने दोन एकरातील ऊसपीक जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शिवारातील ऊस पिकाला शॉर्टसर्किटने आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. हा प्रकार शिवारातील काही शेतकऱयांच्या निदर्शनास आला. त्यांनी लागलीच इतर शेतकऱयांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्व शेतकऱयांनी येऊन आग आटोक्मयात आणल्याने इतर ऊसपीक बचावले. मात्र तोपर्यंत दोन एकरातील ऊस पीक जळून खाक झाले होते. चंद्रकांत जाधव, सुनील जक्कन्नावर, वर्धमान पगडी, रवींद्र जक्कन्नावर, पिंटू हलगी व रणजीत पाटील या शेतकऱयांचे सुमारे दोन एकरातील ऊसपीक जळून खाक झाले. त्यामुळे या शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱयांनी पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.









