न्यूझीलंड, बांगलादेश दौऱयासाठी भारताच्या चार संघांची घोषणा
वृत्तसंस्था/ ऍडलेड
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने आगामी स्पर्धांवर नजर ठेवत नव्या खेळाडूंना आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला असून टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर होणाऱया न्यूझीलंड व बांगलादेशविरुद्धच्या मालिकांसाठी त्यांनी तीन वेगवेगळय़ा कर्णधारांची निवड केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाकडे तर वनडे मालिकेसाठी शिखर धवनकडे नेतृत्व सोपविले आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱया वनडे व कसोटी मालिकेसाठी मात्र रोहित शर्माकडे नेतृत्व कायम ठेवले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका वेलिंग्टनमध्ये 19 नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या दोन्ही मालिकांसाठी रिषभ पंत उपकर्णधार असेल. या न्यूझीलंड दौऱयासाठी रोहित शर्मा, कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक, ऑफस्पिनर आर. अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱया वनडे व कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माकडे पुन्हा संघाचे नेतृत्व असेल. या मालिकेत कोहली, अश्विन यांचेही पुनरागमन होईल. बांगलादेश दौऱयात 3 वनडे व दोन कसोटी खेळविल्या जाणार असून त्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होईल. एकाच वेळी चार संघ घोषित करण्याची बीसीसीआयची ही पहिलीच वेळ आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ न शकलेला रवींद्र जडेजाही बांगलादेश दौऱयात पुनरागमन करेल.
खेळाडूंवरील वर्कलोडचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे संघ निवडले असल्याचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सांगितले. ‘विश्रांतीची कोणीही मागणी केली नव्हती. त्यामुळे जे निर्णय घेतलेत ते वर्कलोड नियोजनातूनच घेतले आहेत. संघाच्या मेडिकल टीमकडून आम्हाला कोणाला विश्रांती द्यावी वा खेळवावे, याबाबतचा अहवाल मिळाल्याने आम्ही तसे नियोजन केले आहे,’ असे चेतन यांनी व्हर्च्युअल माध्यम परिषदेत स्पष्ट केले. दिनेश कार्तिकचे वर्ल्ड कपमध्ये निष्प्रभ प्रदर्शन झाले असले तरी त्याला सध्या विश्रांती देण्यात आली आहे, त्याला कायमचा डच्चू दिलेला नसल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे जसप्रित बुमराहला दोन्ही दौऱयासाठी निवडण्यात आलेले नाही. दुखापतीतून तो पूर्ण सावरल्यानंतरच त्याचा विचार केला जाणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमधील सामन्याने सुरू होईल. त्यानंतर 27 व 30 नोव्हेंबरला पुढील दोन सामने होतील. भारताचा बांगलादेश दौरा वनडे मालिकेने सुरू होईल. यातील सामने 4, 7 व 10 डिसेंबर रोजी ढाक्यामधे खेळविले जातील. त्यानंतर पहिली कसोटी 14-18 डिसेंबर, दुसरी कसोटी 22-26 डिसेंबर या अवधीत होईल.
न्यूझीलंडसाठी टी-20 संघ ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्शल पटेल, सिराज, भुवनेश्वर, उमरान मलिक.
वनडे संघ ः शिखर धवन (कर्णधार), पंत (उपकर्णधार), गिल, हुडा, सूर्यकुमार, श्रेयस, सॅमसन, सुंदर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, चहल, कुलदीप, अर्शदीप, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेशसाठी वनडे संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), धवन, कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शमी, सिराज, दीपक चहर, यश दयाल.
कसोटी संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, कोहली, श्रेयस अय्यर, पंत, केएस भरत, आर.अश्विन, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, शमी, सिराज, उमेश यादव.









