युक्रेनच्या पॉवर प्लान्टवर हल्ले, धान्य निर्यातीतही आडकाठी
किव्ह / वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेनमधील 250 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध संपण्याचे नाव घेत नाही, उलट तीव्र होत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि इतर पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचे स्पष्टीकरण दिले. तसेच पुतिन यांनी काळय़ा समुद्रातून धान्य निर्यातीतील भागीदारी थांबवल्याचेही स्पष्ट केले.
24 फेब्रुवारीपासून रशिया- युक्रेन युद्ध सुरू होऊन 250 दिवस झाले आहेत. ही स्तब्धता वेगाने दूर होत आहे. सोमवारी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर ड्रोनमधून क्षेपणास्त्रे डागली. राजधानी किव्हमध्ये मोठा स्फोट झाला. रशियन सैन्याने युक्रेनच्या किमान सहा भागात पायाभूत सुविधांवर बॉम्बफेक केल्याचे युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी फेसबुकवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रशियन हल्ल्यांनंतर सुमारे दीड लाख लोक विजेविना दिवस काढत आहेत. यामध्ये युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव्ह येथील 50,000 लोकांचा समावेश आहे. युक्रेनच्या लष्कराने 50 पैकी 44 रशियन क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.
क्रिमियामध्ये रशियाच्या लष्करी ताफ्यावर युक्रेनने ड्रोन हल्ले केल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने धान्याची जहाजे नेण्यासाठी वापरल्या जाणाऱया सुरक्षित सागरी कॉरिडॉरचा वापर युक्रेनने हल्ला करण्यासाठी केल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे, युक्रेनने हा आरोप फेटाळून लावत धान्य निर्यातीसाठी बांधलेल्या सागरी सुरक्षा कॉरिडॉरचा वापर रशियन सैन्यावर हल्ला करण्यासाठी केला नसल्याचे सांगितले.









