कोणत्याही देशाचे भविष्य त्या देशातल्या तरुणांवर अवलंबून असते. तारुण्य हा मानवी जीवनातील सर्वात आकर्षक काळ आहे. या काळात माणसाकडे ऊर्जा, आकांक्षा आणि इच्छापूर्तीसाठी आवश्यक असणाऱया साहित्याचा भरमसाठ साठा असतो. आणि तारुण्यात मिळालेले अनुभव घेऊन जेव्हा माणूस जगात एक स्वतंत्र जबाबदार व्यक्ती म्हणून पाऊल ठेवतो तेव्हा जगात एक नवीन पर्व सुरू होते. म्हणूनच प्रत्येक पिढीमध्ये काही न काही बदल आपल्याला बघायला मिळतात. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपली सर्वात मोठी ताकद ही आपली लोकसंख्या आहे. भारत देश पावलोपावली प्रगती करत आहे आणि त्यामुळेच आज भारतातील 90 टक्के तरुणांना लिहिता वाचता येते. भारतात अशा अनेक उल्लेखनीय शैक्षणिक संस्था आहेत ज्या तरुणांना गुणात्मक ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण आजच्या काळात केवळ शिक्षण आणि पदवी माणसाला यशस्वी बनवत नाही. त्याच्या गुणवत्तेसोबत अनेक बाह्य घटक त्याचे/तिचे भविष्य घडवण्यासाठी जबाबदार ठरतात. पण या नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. अभ्यासाच्या आणि समाजाच्या तणावासोबतच मुलांना एकमेकांमधील स्पर्धेलासुद्धा सामोरे जावे लागते. कित्येक मुले अनेक वर्षे प्रयत्न करूनसुद्धा हवे तसे शिक्षण प्राप्त करू शकत नाहीत. याला कारणीभूत देशाची आर्थिक स्थितीदेखील आहे. आजही भारतीय लोकसंख्येचा एक मोठा भाग दारिद्रय़रेषेखाली येतो. त्यामुळे लोकसंख्या प्रबळ असूनही हवी तेवढी झपाटय़ाने प्रगती होताना दिसत नाही.
पण मग त्या मुलांचे काय ज्यांच्याकडे उच्च शिक्षण घेण्याची साधने व संपत्ती देखील आहे? ही मुले कर्ज काढून किंवा पालकांकडून लाखो रुपये घेऊन परदेशात जातात. लाखांनी खर्च करूनही ते याला गुंतवणूक म्हणून पाहतात. यामुळे, भारतातून भरपूर पैसे परदेशात जातात आणि त्याचा परदेशी अर्थव्यवस्था वाढायला फायदा होतो. विकीपीडिया वेबसाइटनुसार, गेल्यावषी दहा लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी गेले आहेत. बरेचदा परदेशी शिक्षण घ्यायला जाणारी मुले तिथेच नोकरी शोधतात आणि आपले नवीन आयुष्य एका नवीन देशात सुरु करतात. परदेशी शिकण्याचे फायदे नक्कीच आहेत. मुलांना विविध संस्कृतींचा परिचय होतो, व्यावहारिक ज्ञान मिळते आणि चांगले उत्पन्न देखील मिळते. त्यामुळे तो/ती आपले आयुष्य आरामात जगू शकतो/शकते. पण जगातील महान लोकशाहीचा नागरिक म्हणून आपण विचार केला पाहिजे की आपल्या देशात या गोष्टींचा अभाव का आहे?
आर्थिक स्थिती एका मिनिटासाठी बाजूला ठेवून या विषयाचा सखोल दृष्टीकोनातून विचार करायला हवा. प्रत्येक मुलाला आणि तरुणांना चांगले शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. आणि तो अनुभव त्यांना त्यांच्या देशात राहून, त्यांच्या माणसांसोबत अनुभवता आला पाहिजे. आणि ते जर आता शक्मय होत नसेल तर समाज म्हणून आपण ते घडवून आणण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय सरकारी संस्थांमधील अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आलेली नाही. काळाप्रमाणे जर माणूस आणि समाज बदलत असेल, तर त्याला घडवणारा अभ्यासक्रमदेखील बदलायला हवा.
सामान्य भारतीय परिवारातील मुलांना हेच शिकवले जाते की चांगली संपत्ती कमवायची असेल तर वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा सरकारी क्षेत्रांमधूनच मिळू शकते. हा विचार पूर्वीच्या काळाप्रमाणे योग्य वाटत असला तरी आता हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जर आपण समाज म्हणून प्रत्येक क्षेत्राकडे एका नवीन दृष्टिकोनाने बघायची गरज आहे. पुस्तकी ज्ञान जेवढे विकासासाठी आवश्यक आहे, तेवढेच व्यावहारिक ज्ञानदेखील आवश्यक आहे. बहुतेक भारतीय शैक्षणिक संस्था, व्यावहारिक ज्ञानापेक्षा सैद्धांतिक ज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करतात. मुलांना लहान वयापासूनच विविध क्षेत्रांची माहिती मिळाली तर ते काम करायला लागल्यावर एक बहुकुशल व्यक्तिमत्त्व विकसित करू शकतील.
भारतीय मुलांचा कल हा परदेशाकडे असण्यामागे काही सामाजिक कारणेदेखील आहेत. भारतामध्ये 1980 च्या राष्ट्रीय मंदीनंतर भरपूर लोक पोटा-पाण्यासाठी देश सोडून गेले. तेव्हा डॉलरचा भाव रुपयापेक्षा जास्त असल्याने डॉलरमध्ये पैसे कमवून लोक चांगले आयुष्य घडवू शकले. त्यानंतर तरुणांचा बाहेर जाऊन शिक्षण घेण्याचा आणि नोकरी करण्याचा कल जास्त वाढला. पण आता गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत.
भारताची प्रगती ही भारतामध्ये राहूनच होईल. जर आपल्याला भारतातील तरुणांनी देशात राहून देशाच्या भल्यासाठी काम करावे असे वाटत असेल तर आपण त्यांच्यासाठी येथे चांगल्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. गणित, विज्ञान, तंत्रज्ञान आणि वित्त यासारख्या पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांसाठी अधिक शिकण्याच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत.
त्याचबरोबर, आपण समाजात उद्योजकीय मानसिकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. जेव्हा लोक त्यांचे स्वतःचे उद्योग सुरू करतात तेव्हा ते इतर लोकांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करतात. समाज म्हणून आपण एकमेकांना आंतरराष्ट्रीय ब्रँड्सपेक्षा भारतीय व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. जर आपले पैसे भारतातच गुंतवले, तर भारतीय व्यवसायांचा नफा वाढेल आणि अर्थव्यवस्थेत सुधार होईल. भारतीय तरुण केवळ जास्त पगारासाठीच नव्हे तर चांगल्या दर्जाच्या जीवनासाठी परदेशात स्थलांतरित होऊ इच्छितात. म्हणूनच, समाज म्हणून, देशात आपल्यासाठी चांगले वातावरण निर्माण केले पाहिजे. शहर स्वच्छ ठेवून, कायद्याचे पालन करून आणि प्रत्येकाला आदराने वागवून आपण ते करू शकतो.
कित्येक वर्षे आपल्या मनामध्ये हे बिंबवले गेले आहे की आपली संस्कृती आणि जीवनशैली कालबाह्य आहे. ब्रिटीश राजवटीनंतर पाश्चात्य संस्कृती भारतीय संस्कृतीपेक्षा श्रे÷ आहे, असे मानायला लावले गेले. पण आपले अस्तित्व आपल्या या अद्वितीय संस्कृतीमुळेच टिकून आहे. तरुण पिढीला पुन्हा एकदा नव्याने आपल्या संस्कृतीचा परिचय करून द्यायला हवा. आपली संस्कृती अभिमानास्पद आहेच, त्याबद्दल अभिमान वाटून ती जपण्यासाठी त्याचा योग्य प्रचार झाला पाहिजे.
आपण लोकांना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यापासून रोखू शकत नाही, पण आपण जगण्यासाठी एक निरोगी समाज नक्कीच जोपासू शकतो. हळूहळू, समाजाच्या मानसिकतेत नक्कीच बदल होईल आणि भारत देशसुद्धा जगातली सर्वात मोठी महासत्ता बनू शकेल.
-श्राव्या माधव कुलकर्णी








