वृत्तसंस्था/ ईटानगर
आसाम अन् अरुणाचल प्रदेशमधील कित्येक दशके जुन्या सीमावादावर नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत तोडगा निघण्याची अपेक्षा असल्याचे उद्गार अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काढले आहेत. आसामच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत त्यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत आसामचे सीमा सुरक्षा तसेच विकास मंत्री अतुल बोरा, अन्य अनेक मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी सामील झाले. एक अंतिम करार तसेच स्थायी तोडग्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्यासोबत माझी एक बैठक होणार आहे. नोव्हेंबरच्या अखेपर्यंत सर्व मतभेद दूर करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत असे खांडू यांनी म्हटले आहे.
नामसाई घोषणेनंतर आसाम आणि अरुणाचल प्रदेश दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 12 समिन्यांची स्थापना करण्यात आली होती. या समित्यांनी मिळून वादग्रस्त क्षेत्रांचा दौरा करत स्वतःच्या राज्य सरकारला अहवाल सोपविला होता. यानंतर दोन्ही राज्यांच्या समित्यांनी सीमावादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी एकत्र येत कार्य केले आहे.









